पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या गॅसची चोरी करून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

या प्रकरणी पोलीस शिपाई समीर रासकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरमधून नोझलच्या साहाय्याने गॅस काढून घेत होता. लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल हे माहित असूनही त्याने सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही. पोलिसांनी त्याच्याकडून ९ हजार ८०० रुपये किमतीचा अवैध गॅस साठा जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई

मोठ्या घरगुती गॅस सिलिंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२४ मार्च) रात्री भोसरीतील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आली.

या प्रकरणात पोलीस शिपाई मयूर गारूडकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३३ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे सिलिंडर जमवून त्यातून सर्किटच्या साहाय्याने चार किलोच्या छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरत होता. ज्वालाग्राही पदार्थाबाबत कोणतीही खबरदारी न घेता लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस टाक्या आणि इतर साहित्यासह २८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

पिंपळेगुरव येथे अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी पोलिसांची कारवाई

भाड्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा करून रिफिलिंग करणाऱ्या एका व्यक्तीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२५ मार्च) सायंकाळी पिंपळे गुरव येथील ६० फुटी रोडवरील विष्णूकर्मा मंदिराजवळ करण्यात आली.

गोपाल राम अर्जुन राम विष्णोई (३८, भाऊनगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती सिलेंडरमधून लोखंडी पाईपच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरत होता. सुरक्षेची कोणतीही तजवीज न करता रहिवासी भागात गॅस सिलिंडरचा साठा केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू; मालकासह तिघांवर गुन्हा

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने न पुरवल्यामुळे एका कामगाराचा डक्टमधून पडून मृत्यू झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी मामुर्डेत घडली.

फुंडी फुलचंद्र चौहान (पुनावळे, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सावनकुमार वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम प्रकल्पाच्या मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कामगार फुंडी फुलचंद्र चौहान याला हेल्मेट, सेफ्टी जॅकेट किंवा शूज यांसारखी सुरक्षा साधने पुरवली नव्हती. तसेच पार्किंगमधील डक्टच्या बाजूने कोणतेही बॅरिकेटिंग किंवा सुरक्षा जाळी लावली नव्हती. मालक आणि सुपरवायझरच्या याच निष्काळजीपणामुळे कामगाराचा डक्टमधून बेसमेंटमध्ये पडून मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

बेकायदेशीरपणे गांजा बाळगून त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२५ मार्च) सायंकाळी चाकणमधील शिक्रापूर रोडवर करण्यात आली.

कृष्णा नारायण सिंग (२०, वासुली फाटा, म्हाळुंगे, खेड; मूळ- तामरा, रिवा, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५३९ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. जप्त केलेल्या या गांजाची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे. चाकण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.