पिंपरी : संसार उद्धवस्त केल्याच्या संशयावरून एका तरुणाने महिलेवर आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या बहिणीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी थेरगाव परिसरात घडली.
यामध्ये दोन्ही महिला जखमी झाल्या असून एका महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीमुळे संसार मोडल्याचा संशय आरोपीला आहे. याच रागातून त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. आरडाओरडा ऐकून फिर्यादीची बहीण बचावासाठी आली असता, आरोपीने तिच्यावरही वार करून तिला जखमी केले आणि तेथून पळ काढला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
पैसे न दिल्याने तरुणाचा चाकूने भोसकून खून
पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाची चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) काळेवाडी येथे घडली. हाशिम सईद राईन (२४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अरबाज सईद राईन (२२, विजयनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सद्दाम मो. मुमताज राईन (३४) आणि मो. शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण ( वय ३०, दोघे. कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरबाज त्यांचा चुलत भाऊ हाशिम राईन हे जेवण करून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींनी “आज पैसे दिले नाही तर याला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने चाकू काढून फिर्यादीच्या डोळ्यावर वार केला. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या हाशिम यांच्या छातीत आरोपीने चाकू खुपसल्याने त्यांचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
गांजा बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक
काळेवाडी परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२५ फेब्रुवारी) काळेवाडी येथे करण्यात आली. प्रतिक राकेश खैरनार (२७, मुकाईनगर, हिंजवडी), मयुर घनश्याम कपाटे (२५, लिंक रोड, अशोकनगर, पिंपरी) आणि अक्षय विजय मंधान (२८, पियुष पार्क, पिंपरीगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी असलेला ९३ ग्रॅम साधा गांजा आणि सुमारे २६.७० ग्रॅम वजनाचा महागडा हायड्रोपोनिक गांजा सापडला आहे. या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत दोन लाख ६५ हजार ३५० रुपये इतकी आहे. आरोपींकडे हा साठा विक्रीच्या उद्देशाने असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
गॅस रिफिलिंग प्रकरणी दोन कारवाया
बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या सिलेंडर मधून मोकळ्या सिलेंडर मध्ये रिफील केल्याबाबत खराबवाडी आणि सावरदरी येथे दोन कारवाया झाल्या. यामध्ये दोघांच्या विरोधात उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई खराबवाडी येथे मंगळवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी करण्यात आली. आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅसची चोरी करत होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने कारवाई केली. आरोपीने गॅस रिफील करताना कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याने शासनाची व ग्राहकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष असवले यांनी फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई सावरदरी येथे करण्यात आली. आरोपीने ज्वलनशील पदार्थांची कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता मानवी जिवाचा धोका निर्माण केला. अवैध गॅस विक्री केंद्रावर त्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून घेत फसवणूक केली. याबाबत पोलीस शिपाई गणेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

