पिंपरी : दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दाव्याच्या रागातून भावाच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले. सुदैवाने पीडित व्यक्तीने स्वयंपाकघराची खिडकी तोडून बाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना ७ जून रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास मावळ तालुक्‍यातील सदुंबरे येथे घडली.

गणेश अनंता गाडे (वय ४२, महाळुंगे, खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत त्‍याचा भाऊ संदीप अनंता गाडे ( वय ४१, सदुंबरे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आणि गणेश यांच्यात वडगाव न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे. याच कारणावरून आरोपी गणेश याने संदीप यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत घराचा मुख्य दरवाजा, सोफासेट, लाकडी कपाट आणि घरातील संपूर्ण वायरिंग जळली आहे.

दुचाकीच्या चावीवरून तुंबळ हाणामारी; दोन्ही बाजूंच्या ४ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील दोंद वस्ती येथे दुचाकीची चावी काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याबाबत पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण चार जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी (६ जून) रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली.

पहिल्या प्रकरणात ३३ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे वडील कोरेगाव फाटा येथे गेले असता, आरोपीने त्यांच्या दुचाकीची चावी काढून शिवीगाळ व मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ आरोपीच्या घरी गेले असता, त्यांना लोखंडी पाइपने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये कानामागे गंभीर दुखापत होऊन ६ टाके पडले आहेत. याच्‍या परस्‍पर विरोधी ३५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चावीच्या वादावरून आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली आणि लाकडी काठी व रॉडने मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादी यांच्या भावाच्या हातावर व डोक्यावर वार करून डावा हात कोपऱ्याजवळ फ्रॅक्चर केला.

देशी, विदेशी दारूविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; १६ प्रकरणांमध्ये २८.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देशी, विदेशी दारूची वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी शहराच्या विविध भागांमध्ये १६ कारवाया केल्या. यामध्ये १ लाख ७९ हजार ४७० रुपयांची देशी दारू, ११ लाख ५७ हजार ६९५ रुपयांची विदेशी दारू आणि १५ लाख रुपये किमतीची सात वाहने जप्त केली आहेत.

चिंचवड, संत तुकाराम नगर, चाकण, निगडी, सांगवी, पिंपरी, महाळुंगे, काळेवाडी, हिंजवडी परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (७ जून) १६ कारवाया केल्या. चिंचवड, चाकण, संत तुकाराम नगर, निगडी, सांगवी येथील कारवायांमध्ये दारूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी एक कार, एक पिकअप, एक रिक्षा आणि चार दुचाकी अशी एकूण १५ लाख रुपये किमतीची सात वाहने जप्त केली. महाळुंगे, चाकण, चिंचवड, चिखली, काळेवाडी आणि हिंजवडी येथे देशी दारूची विक्री केली जात होती. खबऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारत देशी दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली.

संत तुकाराम नगर येथे आलिशान मोटारीमधून विदेशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ८६ हजारांची विदेशी दारू आणि १२ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. चिंचवड, सांगवी, पिंपरी, निगडी येथे दुचाकीवरून दारू नेत असताना चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ९० हजारांची दारू जप्त केली. सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल २८ लाख ३७ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भोसरीत विनापरवाना धोकादायक गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश

भोसरी येथील भाजीमंडई भागात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅसची चोरी व रिफिलिंग करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी (७ जून) रोजी दुपारी दोन वाजेच्या धाड टाकली आहे. याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राहुल बाबाजी डेरे यांनी रविवारी (७ जून) रोजी फिर्याद दिली आहे. आरोपीने गव्हाणेवस्ती येथे विनापरवाना, मोठ्या घरगुती सिलेंडरमधून गॅस रिफिलिंग सर्किटच्या साहाय्याने छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे धोकादायक काम सुरू ठेवले होते. गॅस अतिशीघ्र ज्वलनशील आहे हे माहीत असतानाही सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता तो चढ्या दराने विक्री करत होता. पोलिसांनी आठ हजार ८०० रुपये किमतीचा अवैध गॅस साठा आणि साहित्य जप्त केले आहे.