पिंपरी : अमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचवड परिसरात मोठी कारवाई करत १५ लाख १२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री बिजलीनगर चौक परिसरात करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशना सैतानराम देवासी (२५, बिजलीनगर), मेकाराम ऊर्फ शाम नारायणराम देवासी (२६, बिजलीनगर) आणि पुरण चौथाराम देवासी (२४, कात्रज, पुणे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे १४२ ग्रॅम २३० मिली ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ सापडले. अधिक चौकशीत हा माल त्यांनी कात्रज येथील पुरण देवासी याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. पोलिसांनी अंमली पदार्थासह एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

पिस्तुल आणि काडतुसासह दोघांना अटक

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री इंदोरी बायपास येथे करण्यात आली.

सनी सुरेश शिंदे (३३, कान्हेवाडी, खेड) आणि अभिषेक अशोक येवले (कान्हेवाडी, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई वसीम शेख यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे पिस्तुल, १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस आणि साडेसहा लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

आळंदी येथील एका लॉजमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या मॅनेजरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री योगीराज चौकातील एका लॉजवर करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस शिपाई उदयकुमार भोसले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लॉजचा मॅनेजर असून तो एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वतःची उपजीविका भागवत होता. पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.