पिंपरी : मोशी परिसरात कमरेला तलवार लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२८ एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ऋषिकेश पांडुरंग वानखेडे (वय १९, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील नवीन ९० फुटी रोडवर खडी मशीनकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला आरोपी ऋषिकेश हा शर्टाच्या आत कमरेला लोखंडी तलवार लावून उभा होता. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गांजाची तस्करी करणार्‍या तरुणाला अटक

आकुर्डीतील दत्तवाडी परिसरात अंमली पदार्थ गांजा बाळगणार्‍या एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

प्रेम अतुल पवार (वय २१, रा. खराळवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील सार्वजनिक रस्त्याजवळ आरोपी संशयास्पदरीत्या थांबला होता. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे १२ हजार १०५ रुपये किमतीचा २६९ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.

कुदळेवस्ती परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त

मोशीतील कुदळेवस्ती परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलीस हवालदार विजय दीपक दौंडकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीजवळ रोडवर हा मुलगा ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस घेऊन थांबला होता. पोलीस सह आयुक्तांनी शहरात घातलेली शस्त्रबंदी लागू असतानाही त्याने या आदेशाचा भंग केल्याचे कारवाईत स्पष्ट झाले आहे.

अश्लील चाळे करणार्‍या महिलेवर गुन्हा

तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणार्‍या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ गेट नंबर तीनसमोर महिला आरोपी लैंगिक हावभाव करून आणि शब्द उच्चारून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना अडथळा निर्माण करत होती. सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी पीटा कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

देहूरोड येथे तरुणाचा खून

देहूरोड परिसरात गोळीबार करुन तरुणाचा खून करण्यात आला. रमेश रेड्डी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हा एका हॉटेलजवळ थांबला असताना त्याच्यावर गोळीबार झाला. गोळीबारात रमेश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मागीलवर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्याच्या भावाचा देखील गोळ्या घालून खून करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.