पिंपरी : मोबाइल घेतल्याच्या संशयावरून एकाने ४२ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण करून खून केला. ही घटना मोई गावच्या हद्दीत २९ जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

चाँद याकुब शेख (वय ४२) असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. हरालाल सुभाष चंद्र गौतम (वय २८, रा. निघोजे, खेड, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत व्‍यक्‍तीच्‍या पत्‍नीने शुक्रवारी (३ जुलै) रोजी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरालाल याला फिर्यादीच्या पतीने त्याचा मोबाइल घेतल्याचा संशय होता. याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीचे पती चॉंद शेख यांना चेहऱ्यावर गंभीर मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारून तो पळून गेला होता. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहे.

चऱ्होलीत किरकोळ वादातून हातोडीने वार करून खून

किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका कामगाराचा डोक्यात हातोडी मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील घोलप वस्तीत २ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

करवीरसींग नथुसिंग लोधी (रा. मध्य प्रदेश) असे खून झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. साहिल रामदास दाभाडे (वय २९, रा. घोलप वस्ती, काकडे सिटी, चऱ्होली खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत कंत्राटदार चंद्रकांत पंढरीनाथ भाळे (वय ४३, रा. देहू फाटा, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल दाभाडे याने जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून करवीरसींग लोधी यांच्या डोक्यात हातोडीने मारून त्यांना जिवंत मारले. आळंदी पोलीस तपास करत आहे.

पत्नीसोबतचे संबंध तोडण्यास सांगितल्याने तरुणावार खुनी हल्‍ला

पत्नीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्याच्या रागातून एकावर चाकूने खुनी हल्ला केला आहे. ही घटना ताथवडे भागात २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पत्नीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. फिर्यादीने आरोपीला गाठून ‘माझ्या पत्नीसोबतचे संबंध सोड’ असे बजावले. याचा राग आल्याने आरोपीने ‘तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणून खिशातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर व बरगडीत वार खुनी हल्‍ला केला. वाकड पोलीस तपास करत आहे.

कामावरून काढल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात २ जुलै रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

महेश दीपक सांगळे (वय २६, रा. दौंड, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राहुल कुमार श्रीअकलु दास (वय २८, रा. निगडी, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कुमार हे मॉलजवळ मित्राला भेटून फोनवर बोलत जात होते. तेव्हा पूर्वी त्यांच्याकडे कामाला असणारा आरोपी महेश तिथे आला व त्याने कामावरून काढल्याच्या रागातून धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर, कानाजवळ आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहे.

ट्रान्सपोर्ट कंपनीची ६५ लाखांची फसवणूक

एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाकडून वेळोवेळी ॲडव्हान्स रक्कम घेऊन ६५ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत भोसरी येथील स्पाईन रोडवरील घडली आहे.

याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी संगणमत करून कंपनीला खोट्या बुकिंग ऑर्डर्स दाखवल्या. त्याद्वारे वेळोवेळी ॲडव्हान्स स्वरूपात पैसे लाटून एकूण ६५ लाख ६८ हजार ५६५ रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहे.