पिंपरी : दुचाकीवरून कामाला सोबत जात असताना खेड तालुक्यातील सोळू येथे जंगलात महिलेला गळा आवळून खून  केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या गळ्याला ओढणी बांधून  मृतदेह अडकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पार्वती दराडे (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू महादेव पावडे (३२, मूळ रा. हदगाव, परभणी, सध्या रा. धानोरे, खेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पार्वती दराडे आणि आरोपी विष्णू पावडे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. ते एकत्रित काम करत होते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने दोघेही घराबाहेर पडले. दुचाकीवरून कामावर जात असताना सोळु येथील जंगलात गेले. तिथे विष्णूने पार्वतीचा गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह एका झाडाला स्कार्फच्या साहाय्याने चार फूट उंचीवर बांधून ती आत्महत्या असल्याचे भासवले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

शेतात अफूची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबे गावात शेतात अफूची झाडे लावून त्याची जोपासना करणाऱ्या एका ७७ वर्षीय शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

संपत बाबुराव दर्शिले (७७, रसिकवाडी, जांबे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विक्रम जगदाळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात आरोपी संपत दर्शिले याने विनापरवाना अफूची लागवड केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १६ किलो ८१० ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे २५ लाख १७ हजार ५०० रुपये आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

पिंपरी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला अटक; पतीवरही गुन्हा दाखल

संत तुकाराम नगर भागात विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिला गांजा पुरविणाऱ्या तिच्या पतीवरही गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई शनिवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी करण्यात आली.

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल कपिलेश इगवे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तिच्यासह तिचा पतीवरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर येथील विठ्ठल मंदिरासमोरील सार्वजनिक जागेत आरोपी महिला संशयास्पदरीत्या थांबली होती. तिची झडती घेतली असता ७,९०० रुपये किमतीचा १५८ ग्रॅम गांजा सापडला. विचारपूस केली असता, हा गांजा तिचा पतीने विक्रीसाठी दिला असल्याचे तिने सांगितले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

मद्याच्या नशेत पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला; पतीला अटक

हिंजवडी परिसरात कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास लक्ष्मी चौक परिसरात घडली.

पती महेंद्र सोपान कांबळे (३५, लक्ष्मी चौक, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महेंद्र हा मद्याच्या नशेत होता आणि तो आपल्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण करत होता. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी पत्नी मध्ये पडली असता, महेंद्रला त्याचा राग आला. त्याने टेबलवर असलेला भाजी कापण्याचा चाकू उचलून “तुला खल्लासच करतो” असे म्हणत पत्नीच्या पोटात भोसकला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

काळेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

काळेवाडीतील एका चाळीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवार (२१ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार शेटे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारनगर येथील सूर्यमुखी गणेश मंदिराजवळील एका खोलीत हे आरोपी पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी तिथे छापा मारला असता ५ हजार १७० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

देहूरोड येथे जुगारावर कारवाई

श्रीकृष्ण नगर भागात बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकृष्ण नगरमधील सार्वजनिक ठिकाणी कागदी चिठ्ठ्यांवर जुगाराचे आकडे घेऊन पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २ हजार ६२० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

वाकडमध्ये रिक्षा आणि मोटारीचा अपघात; लोखंडी गजाने चालकाला मारहाण

मुंबई-पुणे हायवेच्या सर्व्हिस रोडवर रिक्षा आणि मोटारीचा अपघात झाल्यानंतर झालेल्या वादात मोटार चालकाने रिक्षा चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास भूमकर चौक ब्रिजजवळ घडली.

याबाबत रिक्षा चालक विशाल पंढरीनाथ जाधव (४३, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी मोटार चालक संभाजी किसन सकपाळ (४५, वाकड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची रिक्षा आणि आरोपीची मोटार यांचा अपघात झाला होता. त्यानंतर संभाजीने “तुझे काय नुकसान झाले आहे, माझे पण नुकसान झाले आहे” असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या लोखंडी गजाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.