पिंपरी : मामाच्या मुलाला सुरू असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर आणि त्यांच्या अल्पवयीन मुलावर शेजाऱ्याने कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी आकुर्डी येथील खंडोबामाळ, पाण्याच्या टाकीसमोर घडली. या प्रकरणी प्रविण रामचंद्र चोपडे (वय ३२, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी समाधान अशोक मोरे (रा. खंडोबामाळ, खडीमशीन, आकुर्डी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समाधान मोरे हा फिर्यादीच्या मामाच्या मुलाला हाताने मारहाण करत होता. त्यावेळी फिर्यादी प्रविण हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. याचा राग धरून आरोपीने “तुला पण खूप माज आलाय, थांब तुझ्याकडे बघतोच” अशी धमकी दिली आणि शिवीगाळ करत घरात पळाला. त्याने घरातील लोखंडी कोयता आणून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील दोन बोटांवर, उजव्या पायाच्या नडगीवर व डाव्या कानाच्या पाठीमागे मानेवर वार करून जखमी केले. भांडणात फिर्यादीचा मुलगा आला असता, त्याच्याही डाव्या तळहातावर कोयत्याचा वार लागून तो जखमी झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत सराईत गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका सराईत गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बालाजीनगर येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई नामदेव सका पोटकुले यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित बाबू पारवे (वय २३, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ३) यांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये रोहित पारवे याला पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून दोन वर्षांसाठी (२४ महिने) हद्दपार केले होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो शहरात आला होता. बालाजीनगर नाल्याजवळ तो संशयास्पदरीत्या उभा असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले असता त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
तरुणाला मारहाण करत मोबाईल फोडला
विनाकारण शिवीगाळ करत एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्या मित्राचा मोबाइल हिसकावून जमिनीवर आपटून फोडण्यात आला. ही घटना शनिवारी च-होलीच्या ९० मीटर रोडवर ताजने मळा येथील मोकळ्या मैदानात घडली. प्रेम उर्फ रघुवीर गंगाधर तरगुडे (शिवनगरी, वडमुखवाडी, च-होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विधीसंघर्षित बालकासह ओंकार युवराज लांडे (वय २३), कृष्णा विजय वाघोले (वय २४) आणि वाघेश्वर कृष्णा रसाळ (वय २०, सर्व रा. कोतवालवाडी, चर्होली) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रासोबत असताना आरोपींनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने, लाथांनी व दगडाने डोक्यावर, कानावर, कपाळावर आणि हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले. याचदरम्यान टोळक्यातील विधीसंघर्षित बालकाने फिर्यादीच्या मित्राच्या हातातील मोबाइल हिसकावून तो जमिनीवर आपटून फोडून नुकसान केले. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जुन्या भांडणाच्या रागातून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निगडी येथील ओटास्कीम परिसरात घडली.
या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीनुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या इमारतीखाली मोटारसायकलवर बसले होते. त्यावेळी आरोपी हा जुन्या भांडणाच्या कारणावरून चिडून तिथे आला आणि त्याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
