पिंपरी : घरगुती कारणावरून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना निगडीतील ओटास्कीम परिसरात गुरुवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उरुवेला घडली.

गायत्री राठोड (३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात साई मनोज राठोड (१६, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज बाळूभाई राठोड (४९, ओटास्कीम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज राठोड याचे त्याची पत्नी गायत्री यांच्यासोबत घरगुती कारणावरून भांडण झाले. या वादातून आरोपीने गायत्री यांना हाताने मारहाण केली आणि फरशीवर पाडून त्यांच्या गळ्यातील ओढणीने जोरात गळा आवळला. या घटनेत गायत्री यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

मद्यासाठी पैसे न दिल्याने मित्राला मारहाण करत लुटले

मद्यासाठी आणि सीएनजी भरण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्राला बेदम मारहाण करून त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना मोशीत घडली. याबाबत संदीप रामचंद्र गुंजाळ (४३, कर्वे नगर, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल ज्ञानेश्वर शिंदे (३५, कर्वेनगर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मद्यपान करण्यासाठी थांबले होते. मद्यपान करून झाल्यावर आरोपीने पैसे मागितले, मात्र फिर्यादीने नकार दिल्याने त्याने फिर्यादीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. तसेच फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या मारहाणीत फिर्यादीच्या छातीच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर कारवाई

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चाकण ते तळेगाव रोडवरील रानुबाई मळा येथे घडली. या प्रकरणात पोलीस हवालदार योगेश्वर कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी दत्ता ज्ञानोबा कोल्हे (२४, रानुबाई मळा, चाकण; मूळ गाव- गडीगौडगाव, जि. बिदर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही परवान्याशिवाय घरगुती ज्वालाग्रही गॅस मोठ्या सिलेंडरमधून लहान टाक्यांमध्ये भरत होता. पोलिसांनी ७ हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह त्याला रंगेहाथ पकडले. त्याने जीवनावश्यक वस्तूबाबत शासन आणि ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.

कचरा टाकण्यावरून दोन महिलांना मारहाण

कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादात शेजाऱ्यांनी एका महिलेसह तिच्या दोन बहिणींना लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोशीत घडली. या प्रकरणात एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपी आणि त्यांचा मुलगा तिथे आले. कचरा टाकण्याच्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या बहिणींना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्या महिलेवर कारवाई

जुना पुणे-मुंबई हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून लोकांच्या येण्या-जाण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार उदय कुमार भोसले यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव आणि शब्दांचा वापर करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत होती. यामुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.