पिंपरी : मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस बिल भरण्याच्‍या बहाण्‍याने मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवली. त्याद्वारे क्रेडिट कार्डची माहिती चोरून एक लाख ९९ हजरी १२८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० एप्रिल २०२६ रोजी घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने शुक्रवारी (१२ जून) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपीने त्यांना मुंबईच्या घराचे गॅस कनेक्शन बिल थकीत असल्याचे सांगितले. बिल न भरल्यास कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या ए.पी.के. फाइलमध्ये फिर्यादीने क्रेडिट कार्डची माहिती भरताच, त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग करून फसवणूक करण्यात आली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

पोलीस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ पासून १२ जून २०२६ दरम्यान वाघोली, मोशी तसेच मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघोली येथील एका ॲकॅडमीमध्ये पोलीस भरतीचा सराव करत असताना त्‍याची एका आरोपीशी ओळख झाली. आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पोलीस भरतीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने ऑनलाइन स्वरूपात एकूण तीन लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

हिंजवडीत साडेअकरा लाखांच्या ‘एम.डी.’ अंमली पदार्थासह एकाला अटक

हिंजवडी येथील मुकाईनगर येथे विक्रीसाठी ११ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचा ‘एम.डी.’ (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ जून) रोजी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१) याला अटक केली आहे. चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुभाष राजेंद्र गुरव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटारीतून ६१ ग्रॅम ७० मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना सापडला. पोलिसांनी त्यांच्याकडून ड्रग्ज, एक चारचाकी आणि तीन मोबाइल जप्त केले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

बंदूक व काडतुसांसह आरोपीला अटक

पिंपरी येथील नेहरूनगर परिसरातविनापरवाना एक बारा बोअर बंदूक व ५ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (११ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

अजयकुमार गोपाल सिंह (वय ३७ वर्षे, रा. वाल्मीकी चाळ, नेहरूनगर, पिंपरी, मूळ- बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष भानुदास राजपूत यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस सहआयुक्तांनी परिसरात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू केला होता. या आदेशाचा भंग करून आरोपीने स्वतःच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीची १२ बोअर बंदूक व ५०० रुपयांची ५ जिवंत काडतुसे विनापरवाना बाळगली असताना तो रंगेहात सापडला. या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.

गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदाराला अटक

खेड तालुक्यातील चिंबळी येथील लोखंडे वस्तीतील एका मोकळ्या पटांगणात घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (११ जून) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

गजानन रामराव पौळ (वय ४५, रा. लोखंडे वस्ती, चिंबळी, मूळ- परभणी) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई अमित अनिल डिखळे यांनी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जीवनावश्यक वस्तू असलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस ट्रान्सफर सर्किटच्या साहाय्याने छोट्या ४ किलोच्या टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे बेकायदेशीर कृत्य केले. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.