पिंपरी : ऑनलाइन शॉपिंगच्या एका ॲपवरून खरेदी करत असताना तांत्रिक अडचण आल्याने मदत मागणाऱ्या एका महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ एप्रिल रोजी निगडी परिसरात घडली.
याप्रकरणी एका महिला फिर्यादीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सॲप नंबर वापरणारा इसम आणि ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्या खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २६ एप्रिल रोजी एका ऑनलाइन ॲपवरून खरेदी करत होती. ऑर्डर प्लेस न होता पैसे कट झाल्याने त्यांनी गुगलवरून त्या ॲपच्या कस्टमर केअर नंबर शोधला. त्यावर संपर्क साधला असता समोरच्या व्यक्तीने त्यांना एका व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादीच्या मोबाइल आणि व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये काही बदल करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून एकूण ९५ हजार रुपये काढून घेतले. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.
बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ७ लाखांची फसवणूक
बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरून ७ लाख २१ हजार रुपयांचे अनधिकृत व्यवहार करून फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे २५ एप्रिल रोजी घडली आहे.
याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीनेबावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी आरोपीने फिर्यादीला फोन केला. आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड क्रमांकावरून ७ लाख २१ हजार ८५४ रुपयांचे ट्रांजेक्शन करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल चार्जिंगच्या कारणावरून पती-पत्नीला बेदम मारहाण
मोबाइल चार्जिंगला लावण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीला लाकडी बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी घडली.
याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी त्यांचा मोबाइल एका लाईटच्या खांबाला चार्जिंगसाठी लावत होते. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, बांबूने आणि दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीलाही बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक खडसे तपास करत आहेत.
टँकर चालकाकडून तरुणाला मारहाण
रस्त्यावरून जाताना वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका टँकर चालकाने दुचाकीस्वाराला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना तळवडे-चिखली रोडवर बुधवारी ( २९ एप्रिल) रोजी घडली.
याबाबत २१ वर्षीय तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रस्त्यात गाडी पुढे घालण्याच्या कारणावरून टँकर चालकाशी त्यांचा वाद झाला. आरोपीने रागाच्या भरात हातातील पोकळ लोखंडी पाईपने फिर्यादीच्या दुचाकीच्या टाकीवर मारून नुकसान केले आणि फिर्यादीच्या डाव्या हातावर प्रहार करून त्यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
भरधाव मोटारीने दुचाकीला उडवले; बाप-लेक गंभीर जखमी
भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे येथे एक एप्रिल रोजी घडली.
याप्रकरणी एका महिलाने एक मे रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती हे मुलीसह दुचाकीवरून जात असताना रस्त्यात यु-टर्न घेत होते. यावेळी आरोपीने मोटार भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या पतीच्या कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, मुलीच्या पायालाही गंभीर इजा झाली आहे. पोलीस हवालदार कोंडालकर तपास करत आहेत.
