पिंपरी : टेलिग्राम व ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल एक कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिखली परिसरात घडली.

याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने टेलिग्रामद्वारे फिर्यादी यांच्‍याशी संपर्क साधला. त्‍यानंतर टेलिग्रामवर लिंक पाठवून ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या यूपीआय पेमेंटद्वारे रक्कम उकळून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. काही काळानंतर फिर्यादीचा ट्रेडिंग आयडी ब्लॉक करून एकूण एक कोटी ९४ लाख १४ हजार पाच रुपये ऑनलाइन पद्धतीने लुबाडण्यात आले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

टास्कच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे सात लाख ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्‍यात आली. ही घटना ६ ते ८ जानेवारी या कालावधीत तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे.

याबाबत एका महिलेने याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. आरोपींनी टेलिग्रामवर विविध टास्कच्या लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने टास्क पूर्ण करण्याच्या नादात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सात लाख ९२ हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी आंबेठाण येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विकी दीपक चव्हाण (२०, सोनबळ वस्ती, आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे; मुळ रा. धानोरा भुसे, जि. वाशिम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्‍हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई शेखर खराडे यांनी उत्‍तर म्हळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ५० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. आरोपी विकी चव्हाण विरोधात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहे.