पिंपरी : सिगारेटचे पैसे मागितल्याचा क्षुल्लक राग मनात धरून दोन तरुणांनी एका पान टपरी चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरोपींनी फेकलेली पेटती माचीसची काडी विझल्याने तरूणाचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना चिखली येथील गणेशनगर, तळवडे भागात सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे.
सचिन सुनील पुणासे (वय २५, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. बुराहनपूर, मध्य प्रदेश) आणि भूषण संजय सुरडकर (वय २५, रा. निगोजे, ता. खेड, मूळ रा. बुराहनपूर, मध्य प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी, मूळ रा. वाहाली, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव यांचे गणेशनगर येथे पान शॉप आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी दुकानातून सिगारेट घेतली. मात्र, वैभव यांनी सिगारेटचे पैसे मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्याशी हुज्जत घातली. आरोपी सचिनने वैभव यांना ‘मी तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही वेळांनी आरोपी पुन्हा दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल होते. आरोपींनी काही कळण्याच्या आत ते पेट्रोल वैभव यांच्या अंगावर फेकले आणि पेटती माचीसची काडी त्यांच्या दिशेने भिरकावली.
सुदैवाने, ती काडी हवेतच विझल्याने वैभव यांचा जीव वाचला व तो तेथून पळून गेला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून त्यांना जेरबंद केले. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस करत आहेत.
निगडीत रिक्षाचालकावर खुनी हल्ला
जुन्या भांडणातून एका तरुण रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना निगडी येथील दत्त मंदिर परिसरात सोमवारी घडली आहे.
गणेश लोणकर (वय २५, रा. निगडी गावठाण) आणि निहाल (वय २१, रा. निगडी गावठाण) यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व गणेश शिंदे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) या रिक्षाचालकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याचाच राग धरून आरोपींनी फिर्यादीला पाठीमागून पकडले, निहालने हात धरले आणि गणेश लोणकरने धारदार शस्त्राने अथर्वच्या गालावर, हनुवटीवर आणि गळ्यावर वार केले. यावेळी लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी आरोपीने मध्ये पडाल तर तुम्हालाही मारेन अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
सेल्समनवर कोयत्याने वार
मद्य विक्रीच्या दुकानात भांडण करणार्या तरुणाला बाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने सेल्समनवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.
सूरज राजू धोगडे (वय १८, रा. वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बाळासाहेब ठोंबरे (वय २८, रा. शिवतेज नगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हे लक्ष्मी चौकातील एका मद्य विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. आरोपी सूरज दुकानात येऊन भांडण करत असताना अनिल यांनी त्याला समजावून सांगत हात धरून बाहेर काढले. याचा राग आल्याने सूरजने त्यांना शिवीगाळ करत जवळ असलेल्या कोयत्याने अनिल यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत पिस्तुलासह तरुणास अटक
भोसरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणार्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ऋषिकेश सुनील घोरपडे (वय २०, रा. गोडाऊन चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी येथील मोकळ्या जागेत अंधारात आरोपी संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्याकडे २६ हजार रुपये किमतीचे पिस्तुल आणि काडतूस आढळून आले. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; मध्य प्रदेशातील आरोपीवर गुन्हा
वाल्हेकरवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाने हे शस्त्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अविनाश प्रकाश गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसोबा मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत एक मुलगा शस्त्र घेऊन थांबल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या झडतीत ५५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल आणि चार हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्याने हे शस्त्र मध्य प्रदेशातील एकाकडून आणल्याचे सांगितले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी बेकायदेशीररीत्या शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे.
अनंता ऊर्फ ओंकार संताजी सोरटे (वय २२, रा. लोहर वस्ती, दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार रितेश माणिक कोळी यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंता याला परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी जुलै २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांतून तडीपार केले होते. तरीही तो विनापरवाना दारुंब्रे-चांदखेड रोडवर वावरत होता. त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि काडतूस मिळून आले आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
