पिंपरी : कौटुंबिक जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून मनात राग धरून एका व्यक्तीने चुलत भावाच्या कुटुंबातील सदस्य झोपेत असताना घर पेट्रोल बॉम्बने पेटवून देऊन संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देहूगाव परिसरात घडली.

या प्रकरणी ७४ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६२ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वडिलाोपार्जित जमिनीच्या वाटपावरून वाद होता. फिर्यादींचे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना आरोपीने घराच्या खिडकीच्या काचा फोडून आत पेट्रोलने भरलेल्या आणि सुतळी बॉम्ब चिकटवलेल्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर लाकडी टेंबा पेटवला. यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सर्वांना जीवे मारण्याचा आरोपीने प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

डिलीव्हरी बॉयवर कोयत्याने हल्ला

ऑर्डर मिळवण्याच्या कारणावरून गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान खुनी हल्ल्यात झाले. पाच जणांच्या टोळक्याने एका डिलीव्हरी बॉयवर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (२८ मार्च) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भोसरी येथे घडली.

गणेश गजानन आसणे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश गजानन आसणे (१७, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कैलास दगडू फुलमाळी (१९, चक्रपाणी, भोसरी), रमेश सिद्धापा कुंभार (धावडे वस्ती, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ गणेश आसणे याला आरोपींनी गाठले. ऑर्डर मिळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने गणेशच्या डोक्यात आणि हातावर वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर आरोपींनी लोकांना मदतीसाठी येण्यापासून रोखले आणि कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

पैसे देण्यास नकार दिल्याने मैत्रिणीला मारहाण

मैत्रिणीने पैसे देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने महिलेला दगडाने मारहाण करत जखमी केले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (२९ मार्च) रात्री एक वाजताच्या सुमारास टाळगाव, चिखली येथे घडली.

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करण विलास महापुरे (३६, टाळगाव, चिखली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गप्पा मारत थांबले असताना आरोपीने फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने चिडून जाऊन शिवीगाळ करत जवळ पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. आरोपीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

जमीन खरेदीच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

जमीन विकण्याचे अधिकार असल्याचे भासवून बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून एका व्यक्तीने महिलेची तीन लाख ३८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २७ जानेवारी २०१९ ते सन २०२० या कालावधीत वडमुखवाडी येथे घडली.

याबाबत एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जमीन खरेदीसाठी आरोपीला टोकन म्हणून २० हजार रुपये आणि त्यानंतर वेळोवेळी रोख व चेकद्वारे एकूण तीन लाख ३८ हजार रुपये दिले होते. आरोपीने मूळ मालकिणीने आपल्याला अधिकार दिल्याचे खोटे सांगून बनावट कागदपत्रे तयार केली. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पैसे घेऊनही खरेदीखत करून न देता आरोपीने त्या रकमेचा स्वतःसाठी अपहार केला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

रावेतमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद; दोघांना कड्याने मारहाण

रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका चालकाने दुसऱ्या चालकाला आणि त्याच्या मेहुण्याला हातातील कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (२९ मार्च) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लंडन ब्रिज रिक्षा स्टँड जवळ, रावेत येथे घडली.

या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडी होत असल्याने फिर्यादीच्या दाजीने आरोपीला रिक्षा मागे घेण्यास सांगितले. याचा राग धरून आरोपीने धक्काबुक्की केली आणि हातातील कड्याने त्यांच्या नाकावर वार केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या नाकावर आणि कपाळावरही आरोपीने कड्याने मारून जखमी केले. रावेत पोलीस तपास करत आहेत.

फोनवर बोलण्यावरून मजुराला तिसऱ्या मजल्यावरून फेकले

बांधकामाच्या ठिकाणी फोनवर बोलण्यावरून हटकल्याच्या रागातून एका मजुराने आपल्या सहकाऱ्याला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यात मजुराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

केशव मोहन महतो असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा केशव महतो हा घराच्या स्लॅबच्या कामासाठी गेला होता. आरोपी हा कामाच्या वेळी फोनवर बोलत असल्याने केशवने त्याला काम करण्यासाठी खाली बोलावले. याचा राग मनात धरून आरोपीने केशवला शिवीगाळ केली आणि त्याची कॉलर पकडून “तू मला सांगणारा कोण?” असे म्हणत त्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. या भीषण घटनेत केशवचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.