पिंपरी : बेकायदेशीरपणे दारू भट्ट्या लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. किरकोळ दारू विक्री केल्याप्रकरणी एका दिवसात पोलिसांनी २० गुन्हे दाखल केले आहेत. यासह दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले रसायन आणि ताडी विक्री प्रकरणी देखील कारवाई करत पोलिसांनी ११ महिलांसह एकूण २९ जणांवर २३ गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी परिसरात चार, एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी तीन, देहूरोड, दक्षिण चाकण, दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन आणि चिंचवड, रावेत, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक असे २३ गुन्हे दाखल झाले आहेत. किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांमध्ये महिला देखील सहभागी आहेत.
फुगेवाडी दापोडी येथील विषारी दारू प्रकरणानंतर पोलिसांनी सुरुवातीला दारू भट्ट्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले. दारू भट्ट्या उध्वस्त केल्यानंतर आता पोलिसांनी दारू विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. दारूविक्रीच्या २० प्रकरणांमध्ये तब्बल ७०० लिटर दारू जप्त केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी महात्मा फुले नगर येथे एका सलून मध्ये सुरु असलेल्या ताडी विक्री केंद्रावर कारवाई करत १०० लिटर ताडी जप्त केली. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरु असलेल्या दोन दारुभट्ट्यांवर कारवाई करत २२०० लिटर रसायन नष्ट केले आहे.
चिंचवडमध्ये जावयाला बेदम मारहाण; पत्नीसह सासू, मेहुण्यावर गुन्हा
चिंचवड मधील रामनगर येथे जावयाच्या घरासमोर भांडण करणाऱ्या सासूला जावयाने घरी जाऊन भांडण करण्याचा सल्ला दिला. त्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुण्याने जावयाला बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना शनिवारी (३० मे) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
याप्रकरणी ३८ वर्षीय जावयाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सासू फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन एका महिलेसोबत भांडण करत होती. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन भांडण करण्यास सांगितले. त्या कारणावरून फिर्यादी यांची सासू, पत्नी आणि मेहुण्याने मिळून त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
गाडी घासल्याच्या कारणावरून कंटेनर चालकाला मारहाण
गाडी घासल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका कंटेनर चालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (३१ मे) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण परिसरात घडली.
याप्रकरणी २१ वर्षीय व्यक्तीने दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंटेनर चालक आहेत. त्यांचा कंटेनर आरोपींच्या वाहनाला घासला. या कारणावरून आरोपींनी त्यांचा कंटेनर अडवला. त्यांच्या कंटेनरची तोडफोड करून त्यांना बेदम मारहाण केली. दक्षिण चाकण पोलीस तपास करत आहेत.
ओव्हरटेक केलेल्या ट्रकला धडकून तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक केले. ट्रॅक पुढे जाऊन अचानक वळाला. या ट्रकला धडकल्याने दुचाकी वरील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१ मे) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गायकवाड नगर पुनावळे येथे घडली.
ओमकार शिखरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र ओमकार हे दोघे हिंजवडीकडे दुचाकीवरून जात होते. गायकवाडनगर, पुनावळे येथे आल्यानंतर ट्रकने ओव्हरटेक केले. त्यानंतर ट्रक अचानक वळला. या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने ओमकार याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
