पिंपरी : रॅपिडो बुकिंगच्या भाड्यावरून झालेल्या वादातून चालकाने प्रवाशाला मारहाण करत त्‍याच्‍या बोटाचा चावा घेतल्‍याची घटना सोमवारी (१६ मार्च) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्‍या सुमारास हिंजवडी परिसरात घडली.

संदीप दगडू काळे (३०, धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनुराग किशोर विश्वनाथ भगत (४२, नाना पेठ, पुणे) असे जखमी प्रवाशाचे नाव असून त्‍यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ऑनलाइन ॲपद्वारे वाहन बुक केले असता भाड्यावरून आरोपीसोबत वाद झाला. संतापलेल्या आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या हाताच्या करंगळीला चावा घेत गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

दापोडीत तरुणावर कोयत्याने वार

पाण्याचा जार आणण्यासाठी जात असताना एका तरुणावर डोक्‍यात कोयत्याने वार करून जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. ही घटना सोमवारी (१६ मार्च) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दापोडीतील गुलाबनगर परिसरात घडली.

रोहीत उर्फ झुणझुण्या अशोक गुजरे (१९, दापोडी गावठाण, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तुषार तुकाराम चाराकटले (२४, सिद्धार्थ नगर, दापोडी) असे हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे दुचाकीवरून पाण्याचा जार आणण्यासाठी जात चालले होते. ते दापोडीच्‍या गुलाबनगर येथील अल्‍बन चौक येथे आले असता आरोपी तिथे आला. त्‍याने फिर्यादी तुषार यांच्‍या मागून येत त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करून त्‍यास जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. या हल्‍ल्‍यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

भरधाव दुचाकीची मोटारीला धडक; दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तसेच सहप्रवासीही गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (१७ मार्च) पहाटे सव्‍वा एक वाजताच्‍या सुमारास मुळशी तालुक्‍यातील माण येथे घडली.

मिलन शेख (२२, बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्‍वा एक वाजताच्‍या सुमारास मिलन शेख याने दुचाकी भरधाव वेगात चालवत गतीरोधकावरून उडी घेत नियंत्रण गमावले. त्यानंतर दुचाकीने फिर्यादी यांच्या मोटारीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सह प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मिलन हा स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

द्रुतगती मार्गावर अफू जप्त; राजस्थानातील तरुण अटकेत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वडगाव महामार्ग कार्यालयासमोरील परिसरात अफूची तस्करी करणाऱ्या राजस्‍थानमधील तरुणाला अटक केली. त्‍याच्‍याकडून सात लाख ८४ हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई मंगळवारी (१७ मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

रोशनलाल नारायणलाल जाट (२५, चित्तोडगड, राजस्थान) असे गुन्‍हा दाखल करून अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. मालमत्‍ता गुन्‍हे विरोधी पथकातील पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्‍या सुमारास आरोपीकडून सुमारे ९८० ग्रॅम वजनाचा सुमारे ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचा अफू हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपी हा माल विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगत होता. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

मोटारीची पिकअपला धडक; मद्यपी चालकाला अटक

भरधाव वेगातील मोटारीने पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात मुंबई बंगलोर महामार्गावर बावधन येथे सोमवारी (१६ मार्च) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्‍या सुमारास घडला.

स्वप्नील ऊर्फ रोशन बाळासाहेब पिंगळे (२६, कोथरूड, पुणे, मूळ रा. धाराशिव) असे अटक आरोपीचे नाव आहे. निलेश अरविंद गायकवाड (३९, सातारा) असे पिकअप चालकाचे नाव असून त्‍यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मद्यप्राशन करून मोटार भरधाव वेगात चालवत वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्याने पिकअपला पाठीमागून धडक दिली. अपघातात पिकअप पलटी होऊन त्‍यातील कलिंगडाचेही मोठे नुकसान झाले. तसेच दोघेजण जखमी होऊन पिकअप आणि मोटारीचे मोठे नुकसान झाले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

कुंडी खरेदीवरून व्यापाऱ्यावर हल्ला

कुंडी खरेदीच्या कारणावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्‍ल्‍यात व्‍यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (१७ मार्च) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास चऱ्होली परिसरात घडली.

व्यापाऱ्याने दिघी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा कुंडी विक्रीचा व्‍यावसाय आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास आरोपी कुंडी खरेदी करण्‍यासाठी दुकानात आले होते. कुंडी कमी दरात देण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत कुंडीने डोक्यात आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.