पिंपरी : सांगवी पोलिसांनी हरवलेले १३० मोबाइल शोधून नागरिकांना परत दिले. हरवलेले मोबाइल मिळाल्याने मोबाइल धारकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर आणि पोलीस अंमलदार राजकुमार माने यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांचे हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी सीईआयआर पोर्टलचा वापर करून तांत्रिक तपास करण्यात आला. त्यानंतर विविध ठिकाणांहून हे मोबाइल शोधून काढण्यात यश आले. सुमारे १३० मोबाइलचा शोध घेऊन ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हे मोबाइल ७ मार्च रोजी सांगवी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते मोबाइल मालकांना परत करण्यात आले.

आपले हरवलेले मोबाइल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. मोबाइल मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा प्रेरणादायी असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली. सांगवी पोलिसांनी नागरिकांना मोबाइल हरवल्यास तात्काळ तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का विक्री; तिघांवर गुन्हा

ग्राहकांना जेवणासोबत हुक्का पिण्यासाठी देत तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्‍यात आला. या प्रकरणी भुकूम येथील एका हॉटेलवर कारवाई करण्‍यात आली.

याबाबत पोलीस शिपाई संदीप भरत रोकडे (वय ३९) यांनी शुक्रवारी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भुकूम येथील एका हॉटेलमध्ये वेगळा हुक्का झोन न ठेवता ग्राहकांना एकत्र बसवून हुक्का पिण्यास दिला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत हुक्का पॉट, फ्लेवर व अन्य साहित्य असा सहा हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बावधन पोलीस तपास करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव; महिलेवर गुन्हा

सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना अश्लील हावभाव करून त्रास दिल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (६ मार्च) रोजी दिघी-भोसरी-आळंदी रस्त्यावर मॅगझीन चौक परिसरात घडली.

याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३९) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना अश्लील शब्द व हावभाव करून त्रास देत होती. तसेच काही व्यक्तींना हात लावून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणारे कृत्य करत होती. दिघी पोलीस तपास करत आहेत.

गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रिफिलिंग; एकावर गुन्‍हा

घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरताना एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ६ मार्च) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्‍या सुमारास चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरात करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार प्रविण गंगाराम भोमाळे (वय ४३) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोणताही परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. यामुळे स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकत होता. पोलिसांनी कारवाई करत एक मोठा सिलेंडर, आठ छोटे सिलेंडर, रिफिलिंग साहित्य व वजनकाटा असा एकूण १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.