पिंपरी : जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना ३० एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान हिंजवडीत घडली.

या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन आणि मेसेज करून शेअर बाजारात गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला तीन लाख रुपये घेऊन विश्वास संपादन केल्यानंतर, दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल असे सांगून पुन्हा दोन लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला

पिंपरीतील भाटनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगरमध्ये घडली.

या प्रकरणात राज महेश कजानिया (२४, निराधार नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे ऋतिक बाबु पांढरे (१९, भाटनगर, पिंपरी) यांला अटक केली असून त्याच्या साथादाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या मित्राला वारंवार चिडवत असल्याने फिर्यादी त्यांच्या घरच्यांना समजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवत पळ काढला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदानाजवळ घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद मुजावर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन सचिन ससाणे (२१, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता त्याने शहरात प्रवेश केला. त्याच्याकडे ४०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता मिळून आला असून तो एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

निघोजे परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल वेताळ यांनी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे जुगार खेळवत असताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि ३,२०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. दक्षिण म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.