पिंपरी : मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने बंडलमध्ये केवळ तीन खऱ्या नोटा आणि बाकी खेळण्यातील नोटा ठेवून एका तरुणाची तीन लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी (५ एप्रिल) चाकण ते शिक्रापूर रोडच्या कडेला घडली.
या प्रकरणात हुजेब फिरोज बागवान (२६, यादगारसिटी, इंदापूर रोड, बारामती) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश ज्ञानदेव ढाकरे (२१) आणि समीर दिनकर म्हल्ले (२६, शेलगाव, खेड; मूळ- अकोला) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची मोटार तीन लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी तीन लाख रुपये लगेच देतो आणि उरलेले ५० हजार मोटार नावावर झाल्यावर देतो असे सांगितले. मोटारीची पूजा करायची आहे असे म्हणून ते घाईत मोटार घेऊन निघून गेले. फिर्यादीने पैशांचे बंडल तपासले असता, त्यात वरच्या आणि खालच्या मिळून केवळ तीन नोटा खऱ्या होत्या आणि मधल्या सर्व नोटा खेळण्यातील होत्या. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.
मद्याचे पैसे उद्या देतो म्हटल्याने रिक्षाचालकाला मारहाण
हॉटेलमधील बिअरचे १०० रुपये उद्या देतो असे म्हटल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि तीन वेटर यांनी मिळून एका रिक्षाचालक ग्राहकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गहुंजे येथे घडली.
याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने बिअरचे पैसे उद्या देतो असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे फिर्यादीच्या हनुवटीला जखम झाली. उजवा डोळा काळा पडला आहे. तसेच जबडा आणि छातीला मार लागून उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
‘माझ्याकडे का बघतो’ म्हणत रिक्षाचालकावर हल्ला
रिक्षात प्रवाशांची वाट पाहत बसलेल्या एका चालकाला ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हणून दोन तरुणांनी रिक्षाबाहेर ओढून लाकडी फळीने मारहाण केली. ही घटना रविवार (५ एप्रिल) दुपारी दोन वाजता, चांदखेड येथील बस स्टँड जवळ घडली.
याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बस स्टँडवर रिक्षा लावून भाड्याची वाट पाहत होते. यावेळी कट्ट्यावर बसलेल्या आरोपींनी विनाकारण वाद उकरून काढला. त्यांनी फिर्यादीला रिक्षातून बाहेर ओढले आणि जवळच पडलेल्या लाकडी फळीने तसेच हाताने त्यांच्या छातीवर व पोटावर मारहाण करत शिवीगाळ केली. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण
ऑनलाईन पाठवलेले पैसे परत मागितल्यामुळे दोन जणांनी एका कामगाराला शिवीगाळ करत काठीने डोक्यात आणि पाठीत मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवार (४ एप्रिल), सकाळी ११ वाजता, खंडोबा माळ, भोसरी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर घडली.
याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खंडोबा माळ भोसरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात काम करतात. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सुपरवायझरने झाडू खरेदी करण्यासाठी आरोपीच्या फोन पे नंबरवर पैसे पाठवले होते. फिर्यादीने ते पैसे मागितले असता “तू आमच्याकडे पैसे का मागतो” असे म्हणून आरोपींनी वाद घातला. हातातील काठीने फिर्यादीला डोक्यात, पाठीत, पायावर आणि हातावर मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
जुन्या वादातून चुलत भावावर रॉडने हल्ला
जुन्या रागातून चुलत भावाने तरुणाला सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (४ एप्रिल) मोरवाडी कोर्टाजवळ घडली.
या प्रकरणात २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा चुलत भावाविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून घेतले. तिथे दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला आणि आरोपीने सिमेंटचा गट्टू व लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली. जखमी फिर्यादीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले
विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गांजा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले. ही कारवाई एम.आय.डी.सी. भोसरी येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातून ५,६०० रुपये किमतीचा ११२ ग्रॅम गांजा, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याची अपंग पत्नीने हा गांजा विक्रीसाठी आणून दिला होता. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
