पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरतानाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी (१५ एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील वाकड वाहतूक शाखेमध्ये घडली.

या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबलने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरद मनोज चव्हाण (विद्युत कॉलनी, कन्नड, संभाजीनगर) याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल हे वाकड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आरोपी वरद चव्हाण याच्या दुचाकीवर १३ हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता. वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी पकडली. दंड खूप असल्याने त्यातील किमान एक हजार रुपये तरी दंड भरावा असे आरोपी वरद याला सांगण्यात आले. एक हजार रुपये दंड भरताना आरोपींनी वाहतूक पोलीस यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादीवरून यांच्याकडे ५० हजार रुपये आणि आरोपीच्या दुचाकीवरील १३ हजार रुपयांचा दंड भरण्याची मागणी केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

भोसरीतील केमिकल शॉपमध्ये ४१ लाखांचा अपहार

मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ दरम्यान भोसरी येथे घडली. या प्रकरणात ४१ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या दुकानात नोकरीस होता. त्याने दोघांशी संगनमत करून दुकानातील लिक्विड आणि पावडर केमिकल मालकाची परवानगी न घेता परस्पर विकले. या विक्रीतून जमा झालेली ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपये रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी मालकाची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने उद्योजकाची ८४ लाखांची फसवणूक

मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून ८४ लाख ७४ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत मावळ येथे घडली. या प्रकरणात ४३ वर्षीय व्यक्तीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीमध्ये ६५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. या गुंतवणुकीसाठी मार्जिन मनी म्हणून त्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी ८४ लाख ७४ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक न करता पैसेही परत न केल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणाऱ्या एका व्यक्तीची २५ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जानेवारी ते ६ मार्च २०२६ दरम्यान सोमाटणे, मावळ येथे घडली. या प्रकरणात एका व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने इंस्टाग्रामवर ब्लॉक ट्रेडिंग संदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. ग्रुप मधील अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख बँकेचा प्रतिनिधी म्हणून करून दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने विश्वासाने वेळोवेळी २५ लाख ३० हजार रुपये गुंतवले, मात्र त्यांना शेअर्स मिळाले नाहीत आणि परतावाही मिळाला नाही. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.