पिंपरी : वाहतूक कार्यालयामध्ये गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या चालकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (२७ जानेवारी) चिंबळी फाटा येथे घडली.
आनंद दिलीप कारंडे (४२, कारंडेवाडी, माण, सातारा) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावेद महमंद शेख (४०, काळेवाडी), शोएब खलील मोमीन (४०, फुलेनगर वाई, सातारा), राजकुमार रामचंद्र भोसले (२५, सांगोला, सोलापूर) आणि सुनील सखाराम राठोड (२२, जिंतुर, परभणी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कारंडे हे आरोपी जावेदकडे भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी जावेदने शिवीगाळ करत इतर आरोपींना तिथे बोलावून घेतले. एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात छोटा गॅस सिलेंडर मारला, तर दुसऱ्याने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. सिलेंडर हवेत उंचावून आरोपीने आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक भीतीपोटी पळून गेले आणि दुकाने बंद करून घेतली. फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल हॅक करून फळ विक्रेत्याची साडेपाच लाखांची फसवणूक
मोबाइल हॅक करून बँक खात्यातून पैसे परस्पर ट्रान्सफर करत एका फळ विक्रेत्याची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी पिंपळे सौदागर येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.
याप्रकरणी फळ विक्रेत्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बँक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा मोबाइल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्याचा ताबा मिळवून ट्रान्झेक्शन आयडीच्या मदतीने ५ लाख ५० हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. आपल्या खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
बनावट ऑर्डर देऊन ६ लाख ६८ हजारांच्या काजूची फसवणूक
मुंबईतील एका नामवंत कंपनीच्या नावाने बनावट ऑर्डर देऊन भोसरी येथील एका व्यापाऱ्याची ६ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान भोसरी परिसरात घडली.
याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका कंपनीच्या बनावट नावाने ६५० किलो काजूची ऑर्डर दिली. व्यवहार ठरल्यानंतर पैसे एनईएफटीद्वारे पाठवल्याचा खोटा स्क्रीनशॉट फिर्यादीला पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात खात्यावर कोणतीही रक्कम जमा न करता आरोपींनी ६ लाख ६८ हजार ५८९ रुपये किमतीच्या काजूची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; तिघांना अटक
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी गज आणि फरशीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री भोसरीत घडली.
शिवानंद महादेव सुरवसे (२१, पांडवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश असणे (१९), शिलराजवी हातोले उर्फ मोन्या (२०), विशाल कांबळे (२१) यांना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना जुन्या वादावरून आरोपींनी त्यांना अडवले. एका आरोपीने रस्त्यावरील फरशी फिर्यादीच्या कपाळावर आणि हातावर मारली. तर दुसऱ्याने लोखंडी गजाने फिर्यादीचे पाय आणि हात फोडले. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

