पिंपरी : जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून १५ लाख ९१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला फेसबुकवर शेअर मार्केटची एक लिंक दिसली होती. ती ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीला एका ट्रेडिंग कंपनीत रजिस्ट्रेशन करायला लावून ऑनलाईन शेअर्स खरेदी-विक्रीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीने विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १५ लाख ९१ हजार ५० रुपये गुंतवले, मात्र त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.
डिमॅट अकाऊंटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली २० लाखांचा गंडा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २०२१ पासून २ एप्रिल २०२६ या कालावधीत रावेत परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला डिमॅट अकाऊंट उघडण्यास सांगून त्यातून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादीला स्वतःच्या खात्यातून फायदा होत नसल्याचे पाहून आरोपीने “तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, मी माझ्या डिमॅट अकाऊंटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला वेळेवर नफा देतो” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून एकूण २० लाख ५८ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक
ॲप डाऊनलोड करायला लावून गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ९ लाख ७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली.
या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका कंपनीची माहिती देऊन गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी फिर्यादीला एक लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि त्याद्वारे ९ लाख ७ हजार ५०० रुपये गुंतवणूक करायला लावली. ॲपमध्ये ही रक्कम ९० लाखांवर गेल्याचे दिसत होते, मात्र ती काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
सिगारेट न दिल्याने टोळक्याकडून दुकानदारावर कोयत्याने हल्ला
दुकान उघडण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तिघांनी मिळून एका किराणा दुकानदाराला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) रात्री १ वाजण्याच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणात विकास अरुण झिंजाडे (३२, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य उर्फ लाल्या किसन जाधव (३२) आणि अजित उर्फ मद्री रामा पवार (३२, सर्व रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या दुकानासमोर येऊन सिगारेटची मागणी केली. फिर्यादीने दुकानाची चावी नसल्याचे सांगताच आरोपींनी चिडून जाऊन त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. यावेळी आरोपीने जवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
हळू गाडी चालव असे म्हटल्याने एकास मारहाण
गाडी नीट चालव असे सांगितल्याच्या कारणावरून एका दुचाकीस्वाराने टेम्पो चालकावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली.
या प्रकरणी बबलु इस्माईल शेख (४१, बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रितेशकुमार संतोष राम (२२, पिंपरी; मूळ- रोहतास, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपली छोटा हत्ती गाडी घेऊन वळण घेत असताना समोरून आरोपी भरधाव वेगाने दुचाकी घेऊन आला. फिर्यादीने त्याला “गाडी हळू चालव” असे म्हटल्यावर आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या गाडीतील ड्रायव्हर सीटच्या मागे असलेला लोखंडी पाईप काढून फिर्यादीच्या डोक्यावर दोनदा मारले. यामध्ये फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊन ते जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
