पिंपरी : खेड तालुक्यातील एका सहकारी पतसंस्थेत बनावट दस्तऐवज तयार करून सहा कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सन २०१३-१४ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये पतसंस्थेच्या कार्यालयात घडली.
या प्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने कट रचून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचे सोनेतारण, मालमत्ता तारण आणि वैयक्तिक कर्जाच्या व्यवहारात अफरातफर केली. दैनंदिन जमा रकमा रोजकिर्दीस जमा न करणे, बँकेत पैसे भरल्याच्या खोट्या नोंदी करणे, बचत खात्यातून बोगस स्वाक्षरीने पैसे काढणे आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत खोटी गुंतवणूक दर्शवणे अशा प्रकारे ठेवीदारांचा विश्वासघात केला. या व्यवहारामुळे पतसंस्थेसह खातेदार आणि सभासदांची मोठी फसवणूक झाली आहे. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.
सिमेंटच्या गट्टूने प्रहार करत तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न
नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी नेहरुनगर येथे घडली.या प्रकरणी १८ वर्षीय तरुणाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज उर्फ आसिफ शेख (२१, नेहरुनगर, पिंपरी) आणि रामा दुर्गाअप्पा चौधरी (२५, नेहरुनगर, पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या दाजींना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीला पकडून धरले, तर दुसऱ्याने “इसको अब खत्म कर देंगे” असे म्हणत रस्त्याकडेला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोराने मारला. यामध्ये फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूरज आणि रामा या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकासह प्राचार्या विरोधात गुन्हा
इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये व्यायाम करत असताना बास्केटबॉलच्या रिंगचा लोखंडी खांब अंगावर पडल्याने ५ एप्रिल रोजी एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी १५ एप्रिल रोजी इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकासह प्राचार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी २७ वर्षीय तरुणाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्राचार्य, मैदानाची
देखभाल करणारे कर्मचारी, क्रीडा विभाग प्रमुख आणि संस्थेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबुराम वर्मा (२०) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ विशाल वर्मा हा ग्राऊंडवर व्यायाम करण्यासाठी गेला होता. तो बास्केटबॉलच्या रिंगला लटकत असताना लोखंडी खांब अचानक तुटून त्याच्या डोक्यात पडला, ज्यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ग्राऊंडमधील हा खांब जुनाट आणि गंजलेला असतानाही त्याची वेळीच देखभाल न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
मोई गावात शेजाऱ्याकडून दगडाने मारहाण; तरुण गंभीर जखमी
घराबाहेर जाताना काय बोलला, अशी विचारणा करत शेजाऱ्यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोई गावात घडली.या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात थांबवून “दुपारी माझी बहीण आणि पती घराबाहेर जाताना तुम्ही काय बोलला” अशी विचारणा केली. फिर्यादीने आपण काहीच बोललो नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावत शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने रस्त्यावरील दगड घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
शाब्दिक वादातून चाकूने हल्ला; जीवे मारण्याची धमकी
जुना शाब्दिक वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करत पायावर चाकूने वार केले. ही घटना बुधवारी (१५ एप्रिल) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कुरुळी गाव येथील डोंगरे वस्तीत घडली. या प्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीने दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीमध्ये आदल्या रात्री शाब्दिक वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने मद्याच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा केला. आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर आणि चाकूने उजव्या पायाच्या पोटरीवर वार करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
