पिंपरी : बांधकाम व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पाच लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान हिंजवडी चौक येथे घडली.

या प्रकरणी ३५ वर्षीय व्यावसायिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना चार कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बाणेर येथील एका सदनिकेचा समझोता करारनामा केला. त्याची मूळ प्रत आणि आगाऊ सुरक्षा ठेव म्हणून पाच लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, कर्ज न मिळवून देता ही रक्कम परत न करता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

कुरुळीत देहविक्री व्यवसायावर पोलिसांचा छापा

खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी देहविक्री व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणात पोलीस शिपाई भाऊसाहेब पवार यांनी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन महिला आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी महिला आरोपींनी देहविक्री व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भंग केला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

चिंबळी फाटा येथे जुगारावर कारवाई

नाशिक-पुणे हायवे लगत जुगार चालवणाऱ्या दोन तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी मरकड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आरोपी हे लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. दक्षिण म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

वडमुखवाडी येथे महिलेवर कारवाई

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर देहविक्री व्यवसायासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ खळसुडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित महिला आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ नुसार नोटीस देण्यात आली आहे. महिला आरोपी देहविक्री व्यवसायाच्या उद्देशाने अश्लील अंगविक्षेप करून आणि शब्दांचा वापर करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत होती. या कृत्यामुळे सार्वजनिक सभ्यता आणि शिष्टाचाराचा भंग झाल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक

चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनसमोर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. सुभाष बन्सी ओव्हाळ (४२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताप्रकरणी अजय सुभाष ओव्हाळ (२३, साने चौक, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो ट्रक चालक संतोष सुभाष दळगडे (४५, टॉवर लाईन, चिखली; मूळ रा. धाराशिव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील सुभाष ओव्हाळ हे त्यांच्या दुचाकीवरून थरमॅक्स चौकाकडून बर्ड व्हॅलीकडे जात होते. त्यावेळी आरोपी चालकाने टेम्पो वेगाने आणि निष्काळजीपणे पाठीमागे घेऊन दुचाकीला जोरात धडक दिली. ट्रक अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन सुभाष ओव्हाळ यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

मोटारीची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

एका भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी देहूरोड ते तळवडे दरम्यान घडली. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने सहा एप्रिल रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे चालवून धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाला आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली. वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.