पिंपरी : नगरसेवकाच्या कार्यालयासमोर उभा असताना थट्टा-मस्करीमध्ये ‘काळ्या’ असे संबोधल्याचा राग मनात धरून एका तरुणाने हातगाडी चालकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना चिखली येथील जाधववाडी परिसरात बुधवारी (८ एप्रिल) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. तळेगाव दाभाडे परिसरात जमिनीच्या वादातून कुटुंबाचे अपहरण करुन “तुमचा मुळशी पॅटर्न करतो” अशी धमकी दिली.
चिखलीतील घटनेप्रकरणी बब्रुवान सुभाष सुर्यवंशी (वय ३८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश ज्ञानेश्वर मांडगे (वय २२, रा. जाधववाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दालचा राईसची हातगाडी चालवतात. आरोपी हा त्यांचा नियमित ग्राहक आहे. फिर्यादीने त्याला थट्टा-मस्करीमध्ये ‘काळ्या’ अशी हाक मारली. याचा राग आल्याने आरोपीने जवळ असलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
जमीन विक्रीच्या वादातून मारहाण
जमीन विक्रीच्या वादातून कुटुंबाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपयांचा चेक आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळकृष्ण खंडू गाडे (वय ५२) याला अटक केली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय दुय्यम निबंधक कार्यालयासमोर असताना आरोपींनी त्यांना जमीन विक्रीवरून धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना जबरदस्तीने मोटारीत बसवून कातवी रोडवर नेले. तिथे त्यांना पट्ट्याने मारहाण करून जखमी केले. “तुमचा मुळशी पॅटर्न करतो” अशी धमकी दिली. तसेच वडिलांकडून २० लाख रुपयांचा चेक आणि २ हजार रुपये रोख हिसकावून घेतले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
शेअर बाजाराच्या नावाखाली ३५ लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख ६ हजार ५३९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडीत घडली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधून शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांच्या डिमॅट खात्याचा वापर करून इंट्राडे ट्रेडिंगद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘अधिक नफा मिळवून देतो’ असे सांगून फिर्यादीकडून पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती घेत बनावट खाते उघडले. वेगवेगळ्या खात्यांवर २० लाख ३१० रुपये भरून घेतले. दरम्यान, एका आरोपीने व्हॉट्सॲप कॉल करून आपण स्टॉक ब्रोकिंग कंपनी चालवत असल्याचे सांगून ५ लाख गुंतवल्यास दिवसाला २५ हजार नफा देण्याचे आमिष दाखवले. असे एकूण ३५ लाख ६ हजार ५३९ रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल पासवर्ड चोरून मजुराच्या खात्यातून ५० हजार लंपास
एका मजुराच्या मोबाइलचा पासवर्ड आणि फोन पे चा वापर करून त्याच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये चोरले. ही घटना मावळ तालुक्यातील चांदखेड परिसरात मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी घडली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे असून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मोबाइलचा पॅटर्न आणि पासवर्ड चोरून मिळवला. त्यानंतर त्यांच्या परस्पर फोन पे खात्यातून ५० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुभाजकाला धडकून महिला दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एका २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ एप्रिलच्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकात घडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार बळीराम नवले यांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा नागनाथ तुपसांगवे (वय २९, रा. कर्वेनगर, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा या त्यांच्या दुचाकीवरुन कर्वेनगरकडे जात होत्या. चांदणी चौकात वाहन चालवताना त्यांचे नियंत्रण सुटले. दुचाकी वेगाने दुभाजकाला धडकली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
