पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या एका ५९ वर्षीय इसमास भरधाव मोटारीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२० मार्च) सायंकाळी थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ जाणारे रोडवर घडली. फौजदार रामखिलावन यादव (५९, चिखली, पुणे) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई सोमनाथ दिवटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोटार चालक संजय रमेश जिंदल (५६, निगडी प्राधिकरण, निगडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटार चालकाने आपल्या ताब्यातील मोटार अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे चालवले. यावेळी रस्त्याने पायी चाललेले फौजदार रामखिलावन यादव यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

पेट्रोल भरून घरी परतणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला मोटारीने समोरून धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले. या अपघातात तरुणाच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी (१४ मार्च) पिंपळे गुरव येथे घडली.याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा हा आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घरी परतत होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव मोटारीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील हाड फॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर मोटार चालक घटनास्थळावरून पसार झाला असून सांगवी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जिममध्ये नॅपकिन न वापरल्याच्या वादातून तरुणावर वार

जिममध्ये व्यायाम करताना उपकरणांवर नॅपकिन न वापरल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना गुरुवारी म्हाळुंगे येथे घडली.याबाबत २८ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिममध्ये व्यायाम करताना नॅपकिन वापरण्यावरून फिर्यादी आणि आरोपीमध्ये वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला गाठले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने फिर्यादीच्या कपाळावर आणि ओठाच्या खाली वार करून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

घरगुती वादातून मोठ्या भावाला मारहाण

कौटुंबिक वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाला लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (२१ मार्च) देहुगाव येथील नायडुनगर परिसरात घडली.याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्या लहान भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या मालकीच्या पिकअप टेम्पोवरून फिर्यादी आणि आरोपी भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने “तू मला टेम्पो मागायचा नाही” असे म्हणत फिर्यादीशी हुज्जत घातली. रागाच्या भरात आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातावर जोरात प्रहार केला, ज्यामुळे फिर्यादी जखमी झाले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.

चिंचवडमध्ये ५६ हजारांचा अंमली पदार्थ जप्त; दोन जणांना अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचवड परिसरात छापा टाकून ५६ हजार ८०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त केली. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी (२० मार्च) रात्री ९:१५ वाजता, वाल्हेकरवाडीत करण्यात आली.अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ माउली नामदेव वानखेडे (२५, वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि मोहनलाल गोमाजी भाटी (५५, राजस्थान) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर हा आपल्या पान स्टॉलमध्ये बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे ५६ हजार ८०० रुपये किमतीची तपकिरी रंगाची पावडर मिळून आली. अधिक चौकशीत त्याने हा माल मोहनलाल भाटी याच्याकडून आणल्याचे कबूल केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.