पिंपरी : खेड तालुक्यातील चिंचोशी येथे एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या दोघांनी कोंबड्या आणि खाद्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चिंचोशी येथील एका पोल्ट्री फार्मवर घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय तरुणाने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या पोल्ट्री फार्मवर कामगार म्हणून काम करत होते. त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून ७५ हजार रुपये किमतीच्या ३७० जिवंत बॉयलर कोंबड्या आणि एक लाख ३२ हजार रुपये किमतीची कोंबडी खाद्याची ६० पोती, असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा माल परस्पर चोरून नेला. चाकण पोलीस तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली. चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार जणांना अटक केली असून तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरीत १६ किलो गांजासह दोघे अटकेत

भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून तो विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१७ फेब्रुवारी) देवकर वस्ती, भोसरी येथे करण्यात आली. विशाल रावण मोहिते (२४, यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव) आणि गणेश बाबुराव थोरात (२४, यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक माने यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागेत आरोपींनी विक्रीसाठी १६ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगला होता. पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

भाटनगर येथे गांजा विकणाऱ्या तरुणावर कारवाई

पिंपरीतील भाटनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी भाटनगर येथे करण्यात आली.

सनि धर्मासिंग माचरेकर (२१, भाटनगर, पिंपरी; मूळ- श्रमिकनगर, ओझर मिग, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विष्णू भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनि माचरेकर हा भाटनगर येथील रस्त्याच्या कडेला गांजाची विक्री करण्यासाठी थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १४ हजार ५०० रुपये किमतीचा २९६ ग्रॅम गांजा मिळून आला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

महिलांकडून गांजाची तस्करी; ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरीतील भाटनगर परिसरात कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या महिलांचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई मंगळवारी (१७ फेब्रुवारी) भाटनगर येथे करण्यात आली.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश कर्पे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात तीन महिला आरोपींचा समावेश असून, त्यातील एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपीकडे ८९ हजार ६०० रुपये किमतीचा १ किलो ५९२ ग्रॅम गांजा आणि मोबाईल मिळून आला. चौकशी दरम्यान तिने हा गांजा एका महिला साथीदाराकडून घेतल्याचे आणि दुसऱ्या एका महिलेला विक्रीसाठी देणार असल्याचे सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

म्हाळुंगे येथे गांजासह एकाला अटक

बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मजुरांच्या वस्तीत गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (१७ फेब्रुवारी) म्हाळुंगे येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई दत्ताञय शिंदे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद सरफुद्दीन खालीद (३२, म्हाळुंगे, पुणे; मूळ रा. आझमनगर, कठीयार, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद खालीद याने त्याच्या ताब्यात ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

कोरेगाव बुद्रुक येथे लोखंडी पाईपची चोरी; दोघांना अटक

बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या गोदामातून लोखंडी पाईप चोरून नेणाऱ्या टोळीवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) कोरेगाव बुद्रुक येथे घडली.

या प्रकरणात समर सुधाकर पाचारणे (२७, राक्षेवाडी, खेड) यांनी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू सिताराम लोंढे (४५, कोरेगाव, खेड) आणि टेम्पो चालक आसिफ चौधरी (२३, कुदळवाडी, हवेली) यांना अटक केली आहे. इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेतून आरोपींनी ६० हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप टेम्पोमध्ये भरून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या मजुराने पाठलाग करून टेम्पो चालकाला पकडले. उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.