पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिखली परिसरातील एका लॉजवर धडक कारवाई करत देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात पोलिसांनी नऊ पीडित महिलांची सुटका केली असून, यामध्ये बांगलादेशातून तस्करी करून आणलेल्या एका महिलेचाही समावेश आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि दहशतवाद विरोधी कक्षाने १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. देहू-आळंदी रोडवरील एका लॉजमध्ये लॉजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत लॉज व्यवस्थापक अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्लायांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉज चालक, जागा मालकाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका महिलेला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणले होते. पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका केली असून, तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये सात मसाज पार्लर, स्पा आणि चार हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये आतापर्यंत ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

सांगवी परिसरात दोन पिस्तूल आणि काडतुसांसह दोन तरुणांना अटक

बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१५ एप्रिल) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळ करण्यात आली.

साहिल दत्तात्रय साष्टे (१९, कोथरूड, पुणे) आणि साई विठ्ठल वाशिवले (१९, कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळ संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल, ४ हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे आणि ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

पिंपरी स्मशानभूमी परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त

बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (१५ एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्तीसह अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना एका अल्पवयीन मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्टल मिळून आली. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्याने ही पिस्टल एका व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीमध्ये वाहनांवर कोसळली भिंत

पिंपरी येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या वाहनांवर भिंत कोसळली ही घटना गुरुवारी १६ एप्रिल दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास घडली.पिंपरी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पिंपरी भाजी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीर्ण अवस्थेतील इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला वाहने पार्क केली जातात.

गुरुवारी दुपारी जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत अचानक कोसळली. ही भिंत पार्क केलेल्या तीन दुचाकी आणि एका चारचाकीवर पडली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अडकलेली वाहने बाजूला काढली. रस्त्याच्या बाजूला घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ बघ्यांची गर्दी झाली. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.