पिंपरी : परवानाधारक स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे घुसून महिला कर्मचार्‍यांचे व्हिडीओ चित्रीकरण करत ५० हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या एका हायप्रोफाइल टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या एक कथित माहिती अधिकार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्तीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत स्पा चालकाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रावेत येथील मस्के वस्तीत अधिकृत स्पा व मसाज सेंटर आहे. २३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सामाजिक कार्यकर्तीसह तिचे तीन साथीदार स्पामध्ये जबरदस्तीने घुसले.

‘तुमच्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालतो, असा आरोप करत, कोणतीही परवानगी न घेता तिथल्या महिला कर्मचार्‍यांचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि धंदा बंद पाडण्याची धमकी देत या टोळीने ५० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने तात्काळ ५ हजार रुपये रोख दिले. उर्वरित ४५ हजार रुपयांसाठी आरोपींनी प्रत्यक्ष भेटून सातत्याने धमक्या दिल्या. धक्कादायक बाब म्हणजे स्पामध्ये आलेल्या एका ग्राहकालाही या टोळीने ब्लॅकमेल करून ५ हजार रुपयांची मागणी केली व ५०० रुपये ऑनलाइन उकळले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी चार महिलांवर गुन्हे

सार्वजनिक ठिकाणी उभा राहून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी पिंपरी मध्ये दोन आणि तळेगाव दाभाडे येथे दोन अशा चार महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया मंगळवारी (१६ जून) करण्यात आल्या. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून पिंपरी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिलांवर कारवाई करण्यात आली. तळेगाव दाभाडे येथे जुना पुणे मुंबई महामार्गावर सीआरपीएफ गेट जवळ आणि सोमाटणे फाटा येथे दोन महिलांवर कारवाई करण्यात आली. या महिला वेश्या व्यवसायासाठी नागरिकांना खुणावत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पॉलिसीचे आमिष दाखवून एकाची ३० लाखांची फसवणूक

दिल्ली येथून बिमा लोकपाल बोलत असल्याचे सांगून ६० कोटी रुपयांची पॉलिसी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना तळवडे येथील रुपीनगरमध्ये ५ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली.

याप्रकरणी रुपीनगर येथील ५१ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (१६ जून) चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून ६० कोटी रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी देण्याचे आमिष दाखवले. तसेच यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य कव्हर होतील आणि ॲडमिट झाल्यास तात्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३० लाख २५ हजार ९२६ रुपये ऑनलाइन जमा करून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

गुटखा वाहतूक प्रकरणी तरुणास अटक

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१६ जून) रात्री मिलिंदनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

जुबेर वली अहमद शेख (२५, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश भोई यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेख हा त्याच्या दुचाकीवरून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होता. मिलिंदनगर येथे पिंपरी पोलिसांनी त्याला अडवून त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता त्याच्याकडे गुटखा आढळून आला. पोलिसांनी ४१ हजार ८९३ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरीत पिस्तुल बाळगणारा तरुण अटकेत

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका सराईत तरुणाला पोलिसांनी शेवाळे सेंटर रोडवर अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१६ जून) करण्‍यात आली.

तुषार उर्फ भाजक्या तुळशीराम भिसे (२६,  डिलक्स चौक, पिंपरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. शेवाळे सेंटर रोडवर आरोपी तुषार हा संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्या कमरेला अवैधरित्या बाळगलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतूस मिळून आले.