पिंपरी : पतीसोबत टेम्पोमधून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्‍याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पळ काढला. ही घटना सोमाटणे टोलनाका परिसरात शनिवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. आसिफ सलीम (३९, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीसोबत टेम्पोमधून काळेवाडी येथे जात होत्या. सोमाटणे टोलनाका परिसरात आरोपीने त्यांच्या वाहनाजवळ येत महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

भरधाव टेम्पोच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने रस्‍ता ओलांडत असलेल्‍या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात खेड तालुक्‍यातील भांबोली गावाजवळ शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर घडला. मनोहर शिवराम मेंगळे (३६) आणि त्यांची पत्नी गीता मनोहर मेंगळे (३४, दोघेही रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत मनोहर यांच्या भावाने उत्‍तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवत रस्‍ता ओलांडत असलेल्‍या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मनोहर मेंगळे आणि गीता मेंगळे यांचा मृत्‍यू झाला. उत्तर म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

अल्पवयीन चालकाच्या टेम्पोची सहा वाहनांना धडक

वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत सहा वाहनांना धडक दिली. यामुळे झालेल्‍या अपघातात वाहनांचे नुकसान झाले तसेच तीनजण जखमी झाले. ही घटना काळेवाडी फाटा सिग्नल येथे रविवारी घडली. याप्रकरणी एका महिलेसह अल्‍पवयीन मुलावरही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. याबाबत ३५ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्‍पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्याने दुचाकी, मोटार आणि रिक्षासह एकूण सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीनजण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महिला आरोपीने अल्‍पवयीन मुलाकडे कोणताही वाहन चालविण्‍याचा परवाना नसताना तसेच त्‍याच्‍याकडून अपघात होण्‍याची शक्‍यता असतानाही त्‍यास टेम्‍पो चालविण्‍यास दिल्‍यामुळे तिच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल करीत त्‍या महिलेला अटक करण्‍यात आली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी भोसरी, चाकण मध्ये दोन कारवाया

बेकायदेशीरपणे गांजा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी भोसरी आणि चाकण परिसरात दोन कारवाया केल्या. यामध्ये ८० हजार ५० रुपये किमतीचा एक किलो ६०२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रविवारी दुपारी कारवाई करत विशाल दिलीप साळवे (१९, बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली. विशाल याने त्याच्या दुचाकीमधून गांजाची विक्रीसाठी वाहतूक केली. त्याच्या ताब्यातून एक किलो ३५२ ग्रॅम वजनाचा ६७ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन आढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसरी कारवाई रविवारी सायंकाळी नाणेकरवाडी चाकण येथे करण्यात आली. यामध्ये एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्‍या सुमारास नाणेकरवाडी येथील जांभूळकर वस्‍ती परिसरातून आरोपी महिलेच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये सुमारे २५० ग्रॅम वजनाचा १२ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल माटे यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.