पिंपरी : भोसरी येथील महात्मा फुलेनगर परिसरात आईवर जादूटोणा केल्याच्या संशयातून दोन तरुणांनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण करित तलवारीने धाक दाखवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार ( एक एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मुलीला आणण्यासाठी गेल्या होत्या.  त्यावेळी  त्यांच्या नातलग महिलेने “तुझ्या नवऱ्याने माझ्यावर करणी केली आहे” असे म्हणून वाद घातला. यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करित मारहाण केली. वादादरम्यान अल्पवयीन आरोपीने घरातून तलवार आणून फिर्यादीच्या मुलावर उगारली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

जुनी सांगवी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत पडून एका पावणे चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) पवनानगर येथे घडली.

प्रियंका मनोज विश्वकर्मा (३ वर्षे ९ महिने) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील मनोज उज्जैन विश्वकर्मा (वय २२, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मनीष बाबासाहेब पवार, जयराम बबनराव कांबळे आणि वसंत कैलास बनसोडे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका खेळत होती. इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. ही टाकी उघडी आहे. या टाकीमुळे जीवितहानी होऊ शकते याची जाणीव असतानाही आरोपींनी त्यावर कोणतेही झाकण किंवा सुरक्षेचे उपाय केले नाहीत. या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

नाल्याचा प्रवाह रोखल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

महापालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करित अनधिकृत मातीचा भराव टाकून नाल्याचा प्रवाह रोखल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगावातील जगतापनगर येथे घडली.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता पंकज सुधाकर धेंडे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना मोकळ्या जागेतील अनधिकृत भराव थांबवण्याबाबत महापालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी काम सुरूच ठेवले. या भरावामुळे परिसरातील नाल्यात माती जाऊन नाला अरुंद झाला. यामुळे पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

कोयत्याने प्राणघातक हल्ला

चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे एका मजुरावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (१ एप्रिल) घडली.

या प्रकरणी रेवण केरबा कावळे (४५, रामनगर, चिंचवड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जनार्धन तुकाराम पांचाळ (५२, नाणेकरवाडी, खेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवण हे कंपनीतून घरी जात असताना आरोपीने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. आरोपीने “मी पारधी आहे, तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत वारंवार हल्ला केला. या झटापटीत फिर्यादीच्या मनगटावर आणि बरगडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. नागरिक मदतीला धावले असता आरोपीने त्यांनाही कोयता उगारून धमकावले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दक्षिण चाकण पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीत गांजा विक्री करणाऱ्या नेपाळी तरुणाला अटक

संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदानावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (१ एप्रिल) सायंकाळी करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहिते यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिनेश प्रेमबहादुर परीहार (२२, नेहरूनगर, मूळ नेपाळ) या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी मैदानावर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या ताब्यातून १४ हजार ६०० रुपये किमतीचा २९२ ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा त्याने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगला होता. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.