पिंपरी : घर सावकाश रंगवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा दात पडला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे रविवारी (२४ मे) रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला घराचा रंग सावकाश द्यावा असे सांगितले होते. यावरून आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीवर लाकडी बांबू व दगडाने हल्ला केला. या मारहाणीत दोघेही जखमी होऊन महिलेचा दात पडला. तसेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक वांगणेकर करत आहेत.
रावेतमध्ये ‘कॅफे’वर छापा
रावेत येथील एका ‘कॅफे’मध्ये कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी २४ वर्षीय कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अशोक बाळासाहेब वाघमारे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅफेमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, बाहेर केवळ कॉफी बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्या तयार करण्यात आल्याचे दिसून आले. येथे तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. पोलीस हवालदार पी. ए. शेलार तपास करत आहेत.
देहूरोडमध्ये एकावर फरशीने हल्ला
देहूरोडमध्ये जुन्या वादातून फरशी फेकून मारत हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कर्तव्यावर असताना आरोपी तिथे आला. त्याला काही दिवसांपूर्वी रूम रिकामी करण्यास सांगतल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या दिशेने फरशी फेकली. ही फरशी त्यांच्या कपाळावर आणि छातीवर लागली. यात ते जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद
एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत २७ हजार ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (२५ मे) रोजीवाकड येथील कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील अर्धवट पुलावर करण्यात आली.
कमलेश भगवान ससाणे (वय ३५, रा. बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे) याला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरे (वय ४६) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे चौक परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ५.४८ ग्रॅम एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, चमचा आणि मोबाइल असा ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मैदानात सोमवारी (२५ मे) रोजी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
दिनेश गोरख माने (वय ३१, रा. विटकर चाळ, नेहरुनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस शिपाई भागवत गायकवाड यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. सध्या शहरात घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीकडे लोखंडी कोयता आढळला. पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आसवले करत आहेत.
दुचाकी चालकांकडून टेम्पोचालकाला मारहाण
भुकूम येथे किरकोळ अपघाताच्या कारणावरून दोन दुचाकीस्वारांनी टेम्पोचालकाला स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (२४ मे) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेम्पो घेऊन जात होता. त्याच्या टेम्पोचा आरोपींच्या दुचाकीला धक्का लागला. यावरून आरोपी संतापले. त्यांनी टेम्पोची समोरील काच फोडली. त्यानंतर शिवीगाळ करत स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण केली. यात तो जखमी झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
