पिंपरी : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका अभियंता महिलेची तब्बल ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चिंचवड परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडली.
या प्रकरणात एका पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला अभियंता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. त्याने फिर्यादीला एका बँकेतून ऑनलाइन कर्ज घेण्यास भाग पाडले. या कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊनही त्याने पैसे न भरता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
ताथवडे येथे कामगार वसाहतीमध्ये एकावर कोयत्याने वार
बांधकाम प्रकल्पावरील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मजूर वसाहतीमधील प्रमुखावर फावड्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ताथवडे येथे घडली.
या प्रकरणी अभिजीत अशोक पिसाळ (३६, दत्तवाडी, आकुर्डी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दीपक रॉय, अब्दुल कलीम आणि मोहम्मद सलीम यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर वसाहतीमधील प्रमुख म्हणून काम करणारे दोघे भांडण करणाऱ्या कामगारांना कॅम्प सोडून जाण्यास सांगण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्याने आरोपींनी फावड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सूरजचे नाक आणि ओठ कापले गेले असून जबडा आतून फाटल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
काम करत नसल्याने भावावर चाकूने हल्ला
काहीही काम करत नाही आणि मद्यपान करतो या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या बरगडीत चाकू खुपसून जखमी केले. ही घटना चाकण येथे घडली.
या प्रकरणात लहान भावाने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील लोक जेवणासाठी पोहे बनवण्यासाठी कांदा कापत असताना आरोपी आणि फिर्यादी यांच्यात कामावरून वाद झाला. संतापलेल्या आरोपीने हातातील कांदा कापायच्या चाकूने भावाच्या डाव्या बरगडीवर वार करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोघांना गांजा विक्री प्रकरणात अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१२ मार्च) तळवडे येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रतीक कवडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र सुरेश पवार (२६, निगडी) आणि बळीराम मोहिते यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र पवार याच्याकडे ४४६ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल आणि एक मोटार मिळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने हा गांजा बळीराम मोहिते याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपींकडून एकूण आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
