पिंपरी : भागीदारीतील मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून एका महिलेची १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरीमध्ये उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका मालमत्तेत भागीदार असल्याचे माहित असूनही, आरोपींनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार केले. त्याआधारे महिला आरोपीने सदर मिळकत आरोपीच्या नावावर करून फिर्यादीची १७ लाखांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला २४ तासांत अटक
सांगवी फाटा येथे अपघात करून पसार झालेल्या एका अज्ञात वाहन चालकाचा छडा लावण्यात सांगवी पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. महेंद्र सपकाळ (२६, सणसवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अपघातात सोहम दीपक व्यास (१९, सांगवी) या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्याचे काका सूरज प्रकाश व्यास (४८) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी सांगवी फाटा ब्रिजखाली बीआरटी मार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने फिर्यादीच्या पुतण्याला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सोहम व्यास याचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर आरोपी चालक हा मदतीसाठी न थांबता आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला होता. सांगवी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासल्यानंतर आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना आरोपीच्या वाहनाचा क्रमांक मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला सणसवाडी परिसरातून अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
आळंदीत ९३ हजारांचा गांजा जप्त
अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत एका तरुणाला गांजासह अटक केली आहे. त्याच्याकडून एक किलो २६० ग्रॅम वजनाचा ९३ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीसीएस चौक, आळंदी येथे करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओम महेश गायकवाड (वय २१, रा. अंबिक चौक, शाहूनगर, पांगरी रोड, जि. बीड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोडवरील एका गॅस दुकानासमोर आरोपी संशयास्पदरीत्या उभा होता. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९३ हजार २०० रुपये किमतीचा १२६० ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाइल आणि बॅग मिळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा
चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टी परिसरात उघड्या जागेवर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिपाई अमोल साळुंखे यांनी गुरुवारी रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी मटका आणि जुगार खेळत आणि खेळवत असताना मिळून आले. त्यांच्याकडून ६ हजार ६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
बावधनमध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा
बावधन येथील सेवा रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून अश्लील वर्तन करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कारोटे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला देहविक्री व्यवसायाच्या उद्देशाने लोकांना खुणा करून आणि अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण करत होती. यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याने तिच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
