पिंपरी : घरात नेहमी ये-जा असलेल्या मैत्रिणीनेच कपाटातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे सुमारे दोन लाख ४१ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना चिंचवड येथे १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली.

याप्रकरणी एका महिलेने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांच्‍या मुलीची मैत्रीण ही नेहमी घरी येत असल्‍याने तिला घरातील दागिने कोठे ठेवतात हे माहिती होते. त्‍या मैत्रिणीने १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्वाच्‍या नकळत घरातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे दोन लाख ४१ हजार ४५० रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

पर्समधून पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

बँकेतून पैसे काढल्यानंतर पर्समधून १० हजार रुपये चोरल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्‍या दरम्‍यान लांडेवाडी, भोसरी येथे घडला.

आसाना रघुवीर सिसोदीया (३२, गुलखेडी, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व ललिता मलखान सिसोदीया (३०, कढीया, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिला यांनी एका बँकेच्‍या लांडेवाडी, भोसरी शाखेतून ६० हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेत आरोपी आसाना व ललिता यांनी फिर्यादी महिलेच्‍या पर्समधून १० हजार रुपये चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

बहिणीच्‍या पतीकडून मेहूणीवर हल्‍ला

बहिणीला आणि तिच्‍या मुलाला आधार का दिला, या कारणावरून बहिणीच्‍या पतीने मेहूणीवर लोखंडी गजाने हल्‍ला करून पायाचे हाड फॅक्‍चर केले. तसेच मेहूणीचा मोबाइल व गळ्यातील सान्‍याचे मंगळसूत्रही चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी पावणे आठ वाजताच्‍या सुमारास देहू आळंदी रस्‍त्‍यावरील मोशी येथे घडली.

याबाबत जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकाविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आपली बहीण व तिचा मुलगा यांना आपल्‍या घरी राहण्‍यास आश्रय दिला. या कारणावरून चिडलेल्‍या आरोपीने शुक्रवारी महिलेला लोखंडी गजाने दोन्‍ही पायांवर मारहाण केली. यामुळे महिलेच्‍या नडगीचे हाड फ्रॅक्‍चर झाले. तसेच महिलेच्‍या हातातील मोबाइल व गळ्यातील दोन ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

गुंतवणुकीचे आमिष दाखवून पाच कोटींची फसवणूक

गुंतवणुकीवर दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची चार कोटी ९७ लाख ४५ हजार २१७ रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना हिंजवडीत घडली. हा प्रकार १२ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडला.

या प्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित आरोपींनी एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्के परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीकडून विविध बँक खात्यांद्वारे एकूण चार कोटी ९७ लाख ४५ हजार २१७ रुपयांची रक्कम उकळली. ठरलेला परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. सायबर पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करत आहेत.

भोसरीत दोन किलो गांजा जप्त

एमआयडीसी भोसरी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करून दोन लाख ७ हजार रुपयांचा ३.९३८ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

सूरज रवि सिंग (म्हाळुंगे, जि. पुणे) व रणजित कुमार सिंग (निघोजे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार संभाजी कवडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे विक्रीसाठी गांजा, मोबाइल व इतर साहित्य आढळून आले. चौकशीत हा माल ओडिशा येथून आणल्याचे निष्पन्न झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

हिंजवडीतील ढवळेनगर परिसरात कारवाई करून पोलिसांनी एक लाख ६२ हजार ६५० रुपयांचा २.८११ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्‍यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) करण्यात आली.

विकास दत्तात्रय बोत्रे (५०, ढवळेनगर, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा भाड्याच्या खोलीत अंमली पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवत होता. गुन्‍हे शाखेच्‍या खंडणी विरोधी पथकाच्‍या छाप्यात गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.