पिंपरी : भोसरी परिसरात एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला घरी बोलावून त्याला मद्यप्राशन करायला लावले. त्यानंतर लाकडी दांडक्याने व रबरी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (२८ मार्च) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पत्नीने त्यांना भोसरी येथे बोलावले. त्यानंतर पत्नीच्या प्रियकराने फिर्यादीला त्याच्या घरी नेले. तिथे प्रियकराबरोबर पत्नीने पतीला मद्यपान करायला भाग पाडले. त्यानंतर प्रियकराने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले. मारहाण सुरू असताना पत्नीने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि प्रियकर पाईपने मारहाण करत असतानाचे चित्रिकरण केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

गॅस टँकरमधून घरगुती सिलिंडरमध्ये अवैध गॅस भरणाऱ्या टोळीवर छापा

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावच्या हद्दीत गॅस प्लांटच्या परिसरात गॅस टँकरमधून घरगुती गॅस टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (३१ मार्च) पहाटे करण्यात आली. अंबादास रोहीदास गाडे (४२, चेंबूर, मुंबई, मूळ- परळी वैजनाथ, बीड), अक्षय रमेश मुंगसे (२५, रासे, खेड) आणि नवनाथ अंकुश होजगे (३४, भोसे, खेड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भैरोबा यादव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गॅस टँकरचे सील तोडून टँकरला काळ्या रंगाचे नोजल पाईप लावले. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ते घरगुती गॅस टाकीत गॅस चोरून भरला. आर्थिक फायद्यासाठी हा गॅस चोरून चढ्या दराने विकण्याचा त्यांचा उद्देश होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४९ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३७ लाखांची फसवणूक

इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३७ लाख २५ हजार ७४१ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली. याप्रकरणी एका व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने इन्स्टाग्रामवर दिसलेल्या जाहिरातीवर क्लिक केले असता त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले.

दर आठवड्याला ३० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीने ३७ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यात १ कोटी ८१ लाखांचा परतावा दिसत होता, मात्र तो काढण्याचा प्रयत्न केला असता कमिशन आणि टॅक्सच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

मोटार घासल्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात मारली बियरची बाटली

ताथवडे परिसरात मोटार घासल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला बियरच्या बाटलीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. ही घटना रविवारी (२९ मार्च) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात ३० वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली मोटार रॅम्पवरून मागे घेत असताना आरोपीच्या पिकअप घासले गेले. याचा राग धरुन चालकाने फिर्यादीच्या मोटारीची चावी काढून घेतली. त्याला शिवीगाळ केली. त्याच वेळी मोटार चालकाच्या मित्राने हातातील रिकामी बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

तळेगाव-चाकण रस्त्यावर भरधाव वेगातील टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. विजय तुळशीराम कापडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलत मामा विजय कापडे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगात चालवत त्यांना धडक दिली. या धडकेत कापडे यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करत आहेत.