पिंपरी : वीस रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या ३८ युवकाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी येथे गेले असता आरोपीने त्यांच्याकडे २० रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. आरोपीने खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या गळ्यावर आणि मानेला वार केला. तसेच उपस्थित नागरिकांना चाकू दाखवत धमकावत दहशत माजवली. “तुम्हा सर्वांना खल्लास करीन” अशी धमकी देत आरोपीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला
चाकणमधील तळेगाव चौक परिसरात एका रिक्षाचालकावर आणि त्याच्या भावावर दगडाने खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री सात वाजण्याच्या सुमारास येवले चहा जवळ घडली. या प्रकरणात योगेश मधुकर मुंगडे (२०, नाणेकरवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नामदेव प्रकाश नाईक (२४, भुजबळ आळी, चाकण), लोकेश विलास खंडाळे (२७, कोंढवा, चाकण) आणि दिप्तेश विलास खंडाळे (२५, कोंढवा, चाकण) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश आणि त्यांचा भाऊ चहाच्या टपरी समोर उभे असताना आरोपींनी तिथे येऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दोघांना लाथाबुक्यांनी आणि दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या भावाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी योगेश यांना ‘तुझा मर्डरच करतो’ अशी धमकी देत मोठा दगड उचलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करत आहेत.
प्लॉट आणि व्यवसायाचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक
चिंचवड परिसरात नवीन व्यवसाय सुरू करून देण्याचे आणि स्वस्त दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि तिच्या पतीची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना महात्मा फुलेनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील आणि भाऊ असलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्यांनी नवीन व्यवसाय व पतसंस्था टाकण्याचे आश्वासन दिले, तसेच २५ लाख रुपये भरल्यास एक गुंठा प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या पतीने वेळोवेळी २३ लाख रुपये आणि भावाच्या खात्यात २ लाख रुपये ऑनलाईन असे एकूण २५ लाख रुपये ऑनलाइन जमा केले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी कोणताही व्यवसाय सुरू करून दिला नाही किंवा प्लॉट नावावर केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांना गंडा
मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ५ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ६ एप्रिल २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणात ४६ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्नाटक येथील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून आरटीजीएस, ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एकूण ५ लाख ४५ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही मुलीला प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीने जेव्हा आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करत त्यांना शिवीगाळ केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
फर्निचरच्या कामाचा जाब विचारल्याने दुकानदाराचे नाक फोडले
काळेवाडी परिसरात फर्निचरचे काम अपूर्ण का ठेवले असे विचारल्याच्या रागातून एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचे नाक फोडण्यात आले. ही घटना सोमवारी विजयनगर येथे घडली. या प्रकरणी बजरंगलाल श्रीनिवास बंग (३५, रिचमंड पार्क, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सलीम मुसा पंजेशा (४४, नढे नगर, काळेवाडी) याला अटक केली असून त्याचा मुलगा आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंग हे त्यांच्या मित्राच्या फर्निचरच्या कामाबाबत विचारपूस करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेले होते. काम पूर्ण का केले नाही, असा जाब विचारल्यामुळे आरोपी चिडला. त्याने बंग यांच्या नाकावर जोरात बुक्का मारला, ज्यामध्ये त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. तसेच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बंग यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने १४ लाखांची फसवणूक
पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २९ हजार रुपयांना गंडवण्यात आले. ही घटना ९ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. आरोपींनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी एकूण १४ लाख २९ हजार ९० रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि त्यांची मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ४२ लाखांची फसवणूक
चिंचवडमध्ये एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडली. या प्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले आणि जास्तीचा नफा मिळवण्यासाठी एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले. या ॲपद्वारे फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. ॲपवर त्यांना खोटा नफा दाखवण्यात आला, परंतु तो नफा काढण्यासाठी पुन्हा टॅक्सच्या नावाखाली पैसे भरण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण ४२ लाख ४८ हजार ९०० रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

