पिंपरी : प्रेमसंबंधातील संशयातून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जुलै देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली येथे घडली.
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलीला फोनवरून बोलून प्रेमाच्या जाळ्यात फसविले. त्यानंतर तिच्यावर संशय घेऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या ताणतणावातून मुलीने घरातील साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
एपीके फाईलद्वारे ६.७० लाखांची फसवणूक
केवायसी डेटा चेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड करायला लावून एका सेवानिवृत्त व्यक्तीची ६ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी ११ ते रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान पिंपळे गुरव येथे घडली.
या प्रकरणी ६१ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारक आणि रक्कम स्वीकारणाऱ्या बँक अकाउंट धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून केवायसी डेटा अपडेट करण्यासाठी एक एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितली. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून अप्रामाणिकपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकूण ६ लाख ७० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
कारच्या काचा फोडून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवत लुटले
थेरगाव येथे एका व्यापाऱ्याच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. अडविण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटले. ही घटना सोमवारी (१० ऑगस्ट) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार थेरगाव येथील एका हॉस्पिटल जवळ पार्क केली होती. आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या कारच्या काचा पेव्हर ब्लॉक, वीट आणि कोयत्याने मारून फोडून नुकसान केले. फिर्यादी हे आरोपींना अडवण्यास गेले असता आरोपीने हातातील कोयता फिर्यादी यांच्या गळ्याला लावला आणि एकाने ने खिशात हात घालून दीड हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
भुगाव येथे लाखाचा गांजा जप्त, हॉटेल चालकाला अटक
बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगलेला १ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून एका हॉटेल चालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भुगाव येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस अंमलदाराने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश गोपाळ शेट्टी (३८, भुगाव) याला अटक करण्यात आली असून एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश शेट्टी याच्याकडून १ हजार ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
