पिंपरी : समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक आणि नागपूर येथील तुरुंग प्रशासनात पोलीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने तीन जणांची ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली आहे. पिंपरी परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची घरी भेट घेऊन त्यांना समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगितले. तसेच त्यांचा पुतण्या आणि आणखी एकाला नागपूर येथील तुरुंग प्रशासनात पोलिसमध्ये भरती करून देतो, असे आमिष दाखवले. या बदल्यात त्याने वेळोवेळी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून एकूण ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपये उकळले. मात्र, कोणालाही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.

जमीन खरेदीच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक

जमिनीच्या व्यवहारातून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना मावळ तालुक्यातील आढले खुर्द परिसरात घडली.

याप्रकरणी औंध मधील ५५ वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जागेबाबत सामंजस्य करार झाला होता. या व्यवहारापोटी आरोपीच्या बँक खात्यावर २६ लाख रुपये फिर्यादींनी दिले होते. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

ट्रकची मोटारीसह अनेक वाहनांना धडक, प्रवासी जखमी

एका मद्यधुंद ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारीला धडक दिली. मोटारीतील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, ट्रक चालकाने पळून जाताना इतरही वाहनांना धडक दिली.

याप्रकरणी रामगीर गुदामगीर गोसावी (वय ४०, रा. ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक सोनू कैलाश पांडे (रा. सोहाना, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी आपल्या मोटारीने आळंदीवरून जेजुरीकडे जात होते. दरम्यान, धानोरे फाटा येथे समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत मोटारीला धडक दिली. या धडकेत मोटारीतील प्रवासी जखमी झाले. अपघात झाल्यानंतर मदतीसाठी थांबण्याऐवजी आरोपीने ट्रक वेगाने पळवून नेत रस्त्यावरील इतर वाहनांनाही धडक दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी तपास करत आहेत.

सहा किलो गांजासह वृद्धाला अटक

चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका ६८ वर्षीय वृद्धाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

याप्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विशाल शिवाजीराव गायकवाड यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६८, रा. पिंपरी) असे गुन्‍हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दळवीनगरकडून लोकमान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या रोडवर चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी जवाहर रामनानी याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा एक मोबाइल आणि सहा किलो ५५ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या मिळून आला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिजुर्डे तपास करत आहेत.