पिंपरी : रस्त्यावर झोपलेल्या भटक्या श्वानाच्या अंगावरून मोटार घातल्याने श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील उद्यमनगर येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने मोटार चालवत असताना रस्त्यावर झोपलेल्या श्वानाच्या अंगावर चाक घातले. या निष्काळजीपणामुळे श्वान गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.

बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक

बनावट सोने खरे असल्याचे भासवून कापड व सोने व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार चाकण परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बनावट सोनसाखळी ५२.२७० ग्रॅम वजनाची असल्याचे भासवून फिर्यादीच्या दुकानात गहाण ठेवल्या. त्यांच्याकडून चार लाख ४४ हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा बनावट सोन्याचे ब्रेसलेट खरे असल्याचे भासवून ते विकण्याचा आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. उत्तर चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भावावर चाकूहल्ला

घर सोडून जात असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी अंकुश पोपट नलावडे (३५, दत्तनगर, माकडगल्ली, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश पोपट नलावडे याला पोलिसांनी अटक केली आहे. अंकुशने झोपडपट्टीत राहून मुले बिघडत असल्याने आम्ही बाहेर जाऊन राहणार असे सांगितले. त्याचा राग आल्याने अविनाश याने शिवीगाळ केली. अंकुश घरासमोरील रस्त्यावर उभे असताना अविनाशने स्वयंपाकघरातील चाकू आणून अंकुशच्या पोटात खुपसला आणि गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

म्हाळुंगेत विद्युतरोहित्राचे तांबे चोरीला

वापरात नसलेल्या विद्युतरोहित्रामधील तांब्याची तार चोरून नेल्याचे दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या विद्युतरोहित्रामधील शंभर किलो वजनाची आणि ४० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीला गेली.