पिंपरी : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १५ मे २०२३ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत मुळशी तालुक्यातील माण  येथे घडली.याबाबत एका व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांना शेअर मार्केट तसेच भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. दरमहा ४ ते ५ टक्के जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादींचे ५७ लाख ६ हजार रुपये आणि इतर गुंतवणूकदारांचे ३ कोटी ५९ लाख १४ हजार ८९२ रुपये असे एकूण ४ कोटी १६ लाख २० हजार ८९२ रुपये जमा केले. कोणतीही रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकास अटक

हिंजवडी येथील एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई करत एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (६ मार्च) रात्री  करण्यात आली.

या प्रकरणी महिला पोलीस हवालदार निलम बुचडे यांनी फिर्याद दिली आहे. वासुदेवन मनि पिल्लेय (४१, पाषाण रोड, पुणे) या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.  हे स्पा सेंटर रुग्णालय, क्लिनिक आणि महिलांच्या वसतिगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणांच्या अगदी जवळ असतानाही तिथे हा अवैध व्यवसाय सुरू होता. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

शुल्लक कारणावरून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

बावधन परिसरात मोटारीतून जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणांना अडवून काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ५ मार्च रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थ्यांने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र पेट्रोल भरून विद्यापीठात परत येत असताना आरोपींनी त्यांना विनाकारण अडवले. आरोपींनी आपसात संगनमत करून दोघांना शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसेच प्लॉस्टिकची खुर्ची आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

तळेगाव-चाकण रोडवर एका भरधाव दुचाकीने बुलेटला दिलेल्या धडकेत एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ६ मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इंदोरीत घडली.

मुक्ताबाई नामदेव घरदाळे (५२, वाघजाईनगर, खराबवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.  याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे त्यांची मावशी मुक्ताबाई घरदाळे यांना बुलेटवरून घेऊन जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाने अविचाराने गाडी चालवून त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात मुक्ताबाई यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक न थांबता पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.