पिंपरी : नातेवाईकाच्या लग्नासाठी दोन-तीन दिवसांकरिता घेतलेली मोटार बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २० सप्टेंबर २०२५ पासून ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली.
याप्रकरणी ऋषीकेश विठ्ठल महापुरे (२४, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भालचंद्र सुखदेव थोरात (३८, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना अटक केली आहे. त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १२ लाख रुपये किमतीची अलिशान मोटार आरोपींनी लग्नाचे कारण सांगून नेली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून मोटारीचे बनावट आरसी बुक, आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवले. या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीची कोणतीही संमती न घेता मोटारीची परस्पर विक्री करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
मद्यपान करुन मोटार चालवू नको म्हटल्याने मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला
मद्याच्या नशेत वाहन चालवण्यास मज्जाव केल्याने एका तरुणाने मित्रावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला. त्याला प्रतिहल्ला म्हणून मित्रानेही तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. याप्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (८ फेब्रुवारी) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली.
पहिल्या प्रकरणात २४ वर्षीय तरुणाने चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. घटनेच्या वेळी आरोपीने जास्त मद्य प्राशान केले होते. त्यामुळे फिर्यादीने त्याला ‘तू मोटार चालवू नको’ असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने “तू मला सांगणारा कोण, तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि मोटारीमधील बिअरची बाटली काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली.
याच्या परस्पर विरोधात जखमनी तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागेश बळीराम चिम याला पोलिसांनी अटक केली आहे. तिघे मित्र एकत्र मद्यप्राशन केल्यानंतर जखमी तरुण आपली मोटार घेऊन जात असताना आरोपीने त्यांना हटकले. “तुला मस्ती आली आहे का, तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणून आरोपीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने डोके बाजूला केल्याने बाटली त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर लागली. यामध्ये फिर्यादीच्या हाताची शिर तुटल्याने त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.
भाड्याने घेतलेला कॅमेरा परत न करता पावणेतीन लाखांची फसवणूक
व्यावसायिक कामासाठी भाड्याने घेतलेला महागडा कॅमेरा आणि इतर साहित्य मुदतीनंतर परत न करता स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना १ जानेवारी ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान हिंजवडी येथे घडली.
याबाबत २७ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून महागडा कॅमेरा आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल भाड्याने घेतला होता. मात्र, भाड्याची मुदत संपल्यानंतरही त्याने साहित्य परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
व्यावसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ६६ लाखांचा गंडा
इंपोर्ट-एक्सपोर्ट आणि रिअल इस्टेट व्यवसायातून मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची ६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना सप्टेंबर २०२० पासून २ जुलै २०२२ या कालावधीत हिंजवडी, औंध आणि बाणेर परिसरात घडली.
याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडे पैसे नसतानाही त्यांच्या जमिनीवर बँकेचे कर्ज काढण्यास लावले आणि ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. कोणताही व्यवसाय न करता किंवा मूळ भांडवल परत न देता आरोपींनी फसवणूक केली आणि पैशांची मागणी केल्यावर फिर्यादीला धमकावले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही छुप्या पद्धतीने वास्तव्य करून दहशत माजवणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री बावधन येथील कोकाटे वस्ती येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस शिपाई ऋषीकेश पाटील यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शंकर बाळासाहेब तोडकर (४३, कोकाटेवस्ती, बावधन) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो परिसरात वावरत होता. त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला असून तो आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण करत होता. बावधन पोलीस तपास करत आहेत.
