पिंपरी : चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास चाकण मार्केट यार्ड जवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीधन इचके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट चारने कारवाई केली. ही कारवाई रविवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास कुरकुंडी सेलू गाव रोडवर करण्यात आली. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शेखर खराडे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ कारणावरून मोटार चालकाला मारहाण

मोटारीला पाठीमागून धडक देऊन तिघांनी चालकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी जाधववाडी चिखली येथे घडली.

सतीश काळूराम शिंदे (४७, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वामी हनुमंत देवकर (२६), हनुमंत विठ्ठल देवकर (५०, चिखली) आणि रामचंद्र उर्फ सुनील शंकर गव्हाळे (२५, मोईगाव, खेड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश हे त्यांची मोटार घेऊन जाधववाडी चिखली येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या ताब्यातील टेम्पोने मोटारीला पाठीमागून धडक दिली. या कारणावरून आरोपींनी सतीश यांच्यासोबत वाद घातला. त्यांना हाताने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ केली. सतीश यांचा चष्मा तोडून तसेच मोटारीला पाठीमागून धडक देऊन नुकसान केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

मोटारीने दुचाकीस्वाराला उडवले

भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात देहू आळंदी रोड चिखली येथे घडला. जखमी झालेल्या ३८ वर्षीय दुचाकीस्वाराने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या वाहनाची बॅटरी दुरुस्त करण्यासाठी कारागिराला आणण्यासाठी जात होते. देहू आळंदी रोडवर त्यांच्या दुचाकीला एका मोटारीने जोरात धडक दिली. मोटारीचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात त्यांच्या डोळ्याजवळ, दोन्ही पायाला, गुडघ्याला गंभीर मार लागला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. तिच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रतीक कवडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने तिच्या ताब्यात बेकायदेशीरपणे विक्री करता गांजा बाळगला, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी तिच्या घरावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये २५ हजार २०० रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.