पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिषेक तिक्क्या रेड्डी (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन अत्तार यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे अभिषेक पिस्तुल घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला हे पिस्तुल देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी शुभम शिवलिंग कुंभार (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रीतम फरांदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील तुपे चाळ चिंचेच्या झाडाजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.