Pimpri Chinchwad Crime News : सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर बदनामीकारक स्टोरी ठेवल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना वाकडमधील माऊली चौक परिसरात घडली आहे.
उत्कर्ष जाधव असे जखमी तरुणाचे नाव आहे. दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय १८, रा.थेरगाव) याला अटक केली असून एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलांना समज देण्यात आली आहे. या प्रकरणी वाकड येथील ४९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टोरीबाबत फिर्यादी यांचा मुलगा उत्कर्ष जाधव याने जाब विचारला होता. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून उत्कर्षला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर व पायावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण
जुन्या व्यवहाराचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी चिखली परिसरातील कुदळवाडीत घडली.
याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरोपींकडे व्यवहाराचे राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रॉडने डोक्यात व गळ्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक
जादा परताव्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतवणूक करून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ नोव्हेंबर २०१७ ते ६ मे २०२६ या कालावधीत घडली.
याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना आरोपी महिलेने तिच्या ग्रुपमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक ३६ टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी २५ लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना ७९ हजार रुपये परतावा मिळाला, मात्र त्यानंतर रक्कम परत मिळाली नाही. आरोपीला २०१८ मध्ये अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर सुटल्यावर त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप रक्कम न मिळाल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीमध्ये गांजासह एकाला अटक
पिंपरीतील अशोकनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी बाळगणार्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पिंपरी येथे करण्यात आली. अभिषेक उत्तम कांबळे (२५, बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पिंपरी मधील एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अभिषेककडे २८ हजार ६०० रुपये किमतीचा ५७२ ग्रॅम गांजा, एक मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. हा गांजा त्याने पिंपरी मधील एका महिलेकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
अश्लील हावभाव करणार्या तीन महिलांवर गुन्हा
आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण करणार्या तीन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार गणेश कारोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी इंद्रायणी नदीवर आरोपी महिला येणार्या-जाणार्या लोकांना अडवून अश्लील हावभाव करत होत्या. सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
