पिंपरी : क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १६ लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर मोबाईल हॅक करून पुन्हा आठ लाखाहून अधिक रुपये काढून एकूण २५ लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने विनोदेवस्ती, हिंजवडी येथे घडली.

या प्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका टेलीग्राम खात्यावरून क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणुकीचे टास्क देण्यात आला. पैसे गुंतवल्यास ३० टक्के कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार, फिर्यादीने त्यांच्या दोन बँक खात्यातून युपीआय आयडी आणि आयएमपीएसद्वारे एकूण १६ लाख ४५ हजार पाच रुपये इतकी रक्कम पाठवली. फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर, आरोपींनी ‘तुम्हांला तोटा झाला आहे, त्यासाठी तुम्ही परत पैसे भरा’ असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीला संशय आला आणि त्यांनी पैसे भरले नाहीत.

त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर आरोपींच्या मोबाईल क्रमांकावरून एका बँकेच्या दोन लिंक आल्या. फिर्यादीकडून त्या लिंक चुकून ओपन झाल्यावर त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून एकूण आठ लाख ५८ हजार ७३३ रुपयांची फसवणूक झाली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

दुचाकीला धक्का मारल्याच्या वादातून तरुणास मारहाण

दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे घडली.

या प्रकरणात वरुण किशोर टोपणे (२०, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश विठ्ठल बालघरे (३६, थेरगाव), योगेश विठ्ठल बालघरे (३९, थेरगाव) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मोटारीला कट मारला, तेव्हा फिर्यादीने हॉर्न दिला. या कारणावरून आरोपीने फिर्यादीची मोटार रोडच्या कडेला थांबवून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. त्यांच्यात धक्का-बुक्की झाल्यावर आरोपीने ‘तू मला ओळखत नाहीस का? मला कमलेश बालघरे म्हणतात, मी इथला गाववाला आहे, तू मला धक्का-बुक्की करतोस का? थांब तुला खतमच करतो’ असे धमकावले. त्याने त्या ठिकाणी त्याचे चार-पाच साथीदार बोलावून घेतले. ते आल्यावर आरोपीने ‘आता याला संपवून टाकू’ असे म्हणत फिर्यादीचा गळा दाबला. आलेल्या चार-पाच इसमांपैकी एकाने त्याच्या हातात असलेल्या पट्ट्याने आणि इतरांनी लाथा-बुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण करून दुखापत केली आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

मित्राला चापट मारल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला

मित्राला चापट मारल्याच्या जुन्या वादातून दोन आरोपींनी एका तरुणावर भाल्यासारखे टोकदार लोखंडी हत्यार आणि टोकदार काचेने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच, त्यांनी फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना सोमवारी(२४ नोव्हेंबर) रात्री नेहरुनगर, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी शुभम ऊर्फ गोटया हरी साबळे (२५, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित ऊर्फ भु-या सिध्दार्थ कांबळे (१८, नेहरुनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांचे वडील त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी टेलरिंगच्या दुकानाजवळ गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी रोहित कांबळे आणि विधीसंघर्षित बालक हे त्यांच्या हातात भाल्यासारखे टोकदार लोखंडी हत्यार आणि टोकदार काच घेऊन आले. त्यांनी ‘आमच्या मित्राला चापट का मारल्या?’ असे म्हणत शुभम यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गालावर, दोन्ही दंडावर आणि पाठीवर भोसकून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या दुचाकीला लाथा मारून हेड लाईटची खोपडी तसेच दोन्ही बाजूचे साईट कव्हर तोडून नुकसान केले आणि परत मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

जावयाकडून सासू, पत्नी आणि आजीला मारहाण

मोटारीत मध्ये बसू न दिल्याच्या रागातून एका जावयाने सासूला, पत्नीला आणि आजीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपीने सासूचे डोके भिंतीवर आदळले आणि धारदार चाकूने त्यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कासारवाडी येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित बाळासाहेब पिसाळ (वय ३६, कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची लहान मुलगी गर्भवती असल्याने तिला बघायला त्यांच्या आईसह तिच्या घरी गेल्या होत्या. फिर्यादीच्या मुलीने आरोपीच्या भावाला व भावाच्या मित्रांना मोटारीमध्ये बसू दिले नाही, या गोष्टीचा राग मनात धरून फिर्यादीचा जावई आरोपी याने फिर्यादीला, फिर्यादीची मुलगी आणि फिर्यादीची आईला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीने फिर्यादीचे डोके भिंतीवर आदळले आणि घरात पडलेल्या प्लॅस्टिकच्या पाईपाने मारहाण केली. त्याचबरोबर आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात घरातील धारदार चाकूने जोरात वार केला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

तडीपार केलेल्या गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (२५ नोव्हेंबर) चिखली येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई नारायण सोमवंशी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रोहित ऊर्फ बाबु प्रकाश हिरे (२७, पाटीलनगर, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हिरे याला पिंपरी- चिंचवड पोलिसांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले. पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून त्याला त्याबात घेतले. त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

ई सिगारेट आणि हुक्का विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

भारत सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, सिगारेट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका दुकानाचा मालक आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी सांगवीत करण्यात आली.

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एकूण ५२ हजार ७८० रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या भारत सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, सिगारेट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रीसाठी साठा करून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर जप्त केला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.