पिंपरी : क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून ३३ लाख ९६ हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान घडली.
याबाबत ३० वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना फोन करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० ते ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादीकडून विविध खात्यांवर मोठी रक्कम जमा करून घेतली. परतावा मागितल्यावर आणखी पैशांची मागणी करण्यात आली. अखेरीस ३३ लाख ९६ हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
जाब विचारल्याने तरुणांवर दगड व दांडक्याने हल्ला
कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारल्याच्या वादातून दोन जणांनी तरुणासह त्याच्या सहकऱ्यावर दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी कुरुळी–चिंचोळी परिसरात घडली.
याबाबत २३ वर्षीय तरुणाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडीत बसले असताना आरोपींपैकी एकाने कुत्र्याला दगड मारला. त्याबाबत फिर्यादीने जाब विचारल्यावर आरोपी संतप्त झाले व त्यांनी फिर्यादी व कंपनीत काम करणारे एकाला दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी चिंचवड परिसरात प्रवेश करून धारदार कोयता घेऊन फिरताना एका गुंडाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (२७ डिसेंबर) रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील एच. ए. मैदान परिसरात करण्यात आली.
शाहरुख नईम शेख (२८, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल भागवत गायकवाड (३८) यांनी याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरूख याला पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते. तडीपारीचा आदेश लागू असताना त्याने पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला. यावेळी तो ३५० रुपयांचा धारदार लोखंडी कोयता घेऊन संशयास्पद फिरताना आढळला. दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो थांबला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२६ डिसेंबर) रोजी चाकण रोड, खराबवाडी येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
अजय हरीदास शिंदे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या चुलत भावाने उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने कंटेनर निष्काळजीपणे व वेगाने चालवित दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अजय शिंदे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तर म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
तस्करी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
सुमारे एक कोटी ३० लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (२७ डिसेंबर) रोजी घोलप वस्ती, मरकळ रोड, आळंदी येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हर्षद कदम यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १ किलो ३८० ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ घेतला होता. तो विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या स्वतःजवळ ठेवला. त्यांच्याकडे व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा मारून कारवाई केली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक कोटी ३० लाख रुपये किमतीचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त केला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
