पिंपरी : फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा दुसर्या बँक खात्यात पाठविण्यासाठी सायबर गुन्हेगार दुसर्यांचे बँक खाते वापरतात. अनेक वेळा बँक खातेदारांना ‘कमिशन’ देऊन किंवा फसवून त्यांची ही बँक खाती वापरली जातात. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, गरजुंची बँक खाती भाड्याने घेऊन किंवा खरेदी करुन फसवणुकीचा पैसा प्राप्त करतात. याचे प्रमाण शहरातही वाढत असल्याचे दिसून येत असल्याने अशा माहितीचे विश्लेषण करून संशयास्पद बँक खात्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. अशा खातेधारकांविरोधात (म्यूल) गुन्हे दाखल करण्याची मोहिम पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी सुरू केली आहे.
झटपट पैशांचे अमिष दाखवून समाजमाध्यमातील टेलिग्राम, व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थी, कमी उत्पन्न असलेले नागरीक आणि नोकरीच्या शोधात असणार्यांना कमिशनचे अमिष दाखवून बँक खाते उघडले जाते. बँक खात्याची खरेदी सायबर गुन्हेगार काही ठराविक रकमेच्या बदल्यात करतात. नागरीकांकडून त्यांची सक्रिय बँक खाती, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड, एटीएम कार्ड आणि बँक खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड खरेदी करतात. सायबर गुन्हेगार नागरीकांकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्यांची नोंदणी करुन चालू खाती उघडली जातात. जेणेकरुन मोठ्या रकमेचे व्यवहार सहज करता येतील. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अशा संशयास्पद बँक खात्यांची पडताळणी करुन म्युल बँक खातेधारकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहिम सुरू केली आहे. गेल्या आठवड्याभरात पोलिसांनी अशा आठ खातेधारकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
म्यूल खाते म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार फसवणुकीचे पैसे लपविण्यासाठी किंवा फसवणुकीची रक्कम दुसर्या बँक खात्यात पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांचा वापर करतात. त्याला ‘म्यूल’ खाते म्हटले जाते. अनेक वेळा बँक खातेदारांना कमिशन देऊन किंवा फसवून त्यांची बँक खाती वापरतात.
कंपनीचे पैसे, जीएसटी पैसे, सीबील वाढविण्यासाठी कर्जाचे पैसे बँक खात्यात येणार असल्याचे सांगून आरोपी नागरीकांकडून वेगवेगळ्या बँकेचे खाते प्राप्त करतात. नागरीकांनी अमिषाला बळी न पडता स्वत:चे बँक खाते कोणालाही व्यवहार करण्यासाठी देऊ नये. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
