पिंपरी : फेसबुकवर ‘सीनियर सिटीझन्स पेन्शन कार्ड’ची खोटी माहिती देऊन एका ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख १६ हजार ९०० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हा प्रकार ४ जून रोजी उदयमनगर, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी अनोळखी फेसबुक अकाउंट धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी येथील एका ज्‍येष्‍ठ नागरिकाने शुक्रवारी (५ जून) रोजी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर पेन्शन कार्डचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय बँकेच्या खात्यांचे दोन नंबर मिळवून, त्यामधून वेळोवेळी एकूण ९ लाख १६ हजार ९०० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत लबाडीने फसवणूक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्‍ठ निरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४.४३ कोटींची फसवणूक

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये १००० टक्क्यांपेक्षा जास्त नफ्याचे आमिष दाखवून पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीची ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ७ मे ते १ जून २०२६ दरम्यान येथे घडला.

याप्रकरणी व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमीन व इतर बनावट लिंक धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने शुक्रवारी (५ जून) रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉइन करून ट्रेडिंगच्या बनावट लिंक्सद्वारे वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ४ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर ॲपवर २६ कोटींचा खोटा नफा दाखवून तो काढण्यासाठी पुन्हा एक कोटी, सात लाख ३७ हजार ८८५ रुपयांचा सर्व्हिस चार्ज मागून ही फसवणूक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.

काळ्या बाजारातील अवैध गॅस साठा जप्त

चोरून व चढ्या भावाने विक्री करण्यासाठी २३ गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (४ जून) रोजी चाकण-आगरकरवाडी रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी दत्तात्रय लोखंडे यांनी शुक्रवारी ५ जून) रोजी चाकण उत्तर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ६९ हजार रुपये किमतीच्या २३ भरलेल्या गॅस टाक्या अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात होता. पोलिसांनी गाडीसह एकूण एक लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दगडे करत आहेत.