पिंपरी : अवघ्या बारा रुपयांसाठी गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून सायबर चोरट्याने चिखली येथील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ५८ हजार ८०० रुपये लंपास केले. ही घटना चिखलीतील नेवाळे वस्ती येथे ६ मे २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतएका पुरुष फिर्यादीने यासंदर्भात मंगळवारी ( १२ मे) रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला ‘तुमचे १२ रुपयांचे एमएनजीएल गॅस बिल थकीत असून पेमेंट न केल्यास कनेक्शन कट होईल’ असा खोटा मेसेज पाठवला होता.
फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवून आरोपीने पाठवलेली ‘बीआयएन एमएनजीएल बिल अपडेट’ नावाची फाईल डाऊनलोड केली. या ॲपमध्ये थकीत १२ रुपये भरण्यासाठी फिर्यादीने क्रेडिट कार्डची माहिती भरली असता, आरोपीने त्यांचा फोन हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या क्रेडिट कार्डमधून चार वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण एक लाख ५८ हजार ८०० रुपये परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या नावाखाली बावधनमध्ये २८ लाखांचा गंडा
शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बावधन येथील एका नागरिकाची २८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत बावधन येथे घडली.
पीडित व्यक्तीने याप्रकरणी १२ मे रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादीने एकूण २८ लाख २६ हजार रुपये गुंतवले. मात्र, आरोपींनी मूळ रक्कम किंवा त्यावर मिळणारा नफा परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीत क्रेडिट कार्डचा वापर करून दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक
क्रेडिट कार्डची माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने हिंजवडी येथील एकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ३ मे २०२६ रोजी दुपारी हिंजवडी फेज ३ येथे घडली.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने १२ मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात इसमाने त्यांच्या एका बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून दोन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले. यामध्ये गिफ्ट कार्ड्स खरेदी करून एकूण दोन लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.
फिर्यादीने यापूर्वी सायबर पोर्टलवर तक्रार केली होती, त्यावरून आता हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
